
Mahayuti Manifesto BMC Election 2026:
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जाहीरनाम्यात महिला, युवक आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या धर्तीवर ‘लाडक्या बहिणी’ योजनेअंतर्गत महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
Prakash Mahajan : “वनमंत्री गणेश नाईक यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारावा”, प्रकाश महाजन यांचा टोला
याशिवाय, युटिलिटी कॉरिडॉरसह मुंबईत सुरू असलेले सिमेंट काँक्रीटचे सर्व रस्ते वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. शहराला प्रदूषणापासून वाचविण्यासाठी तब्बल १७ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची तसेच स्वतंत्र पर्यावरण प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणाही जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वारंवार चर्चेत असलेल्या मुंबई महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जाईल, असेही आश्वासन देण्यात आले आहे. तरुण उद्योजक आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी इनोव्हेशन हब स्थापन करण्याचाही जाहीरनाम्यात समावेश आहे.
महायुतीच्या आगामी जाहीरनाम्यात महापालिकेच्या रुग्णालयांचे किंवा त्यांच्या कोणत्याही विभागांचे खासगीकरण केले जाणार नाही, ही रुग्णालये पूर्णपणे महापालिकेच्याच नियंत्रणाखाली चालविली जातील, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचबरोबर, महापालिकेच्या रुग्णालयांतील वैद्यकीय साधनसामग्री आणि आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यावर विशेष भर दिल जाणार असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
महापालिकेच्या शाळांचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी आवश्यक सुधारणा केल्या जातील. तसेच बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी नवीन बसगाड्या ताफ्यात दाखल करून, मुंबईकरांना स्वस्त दरात व अधिक सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही जाहीरनाम्यात देण्यात येणार आहे.
महापालिकेतील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आणि पारदर्शक कारभार सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. नागरी सुविधा, निविदा प्रक्रिया, खरेदी व्यवस्था आणि इतर प्रशासकीय बाबींमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मचा अवलंब करून पारदर्शकता वाढविण्यात येईल.
मुंबईत विविध यंत्रणा कार्यरत असल्या तरी रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेकडेच राहणार असून, खड्डेमुक्त रस्ते देण्याचे आश्वासन मुंबईकरांना देण्यात आले आहे. यासोबतच नालेसफाई, मिठी नदीतील गाळ काढणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे बळकटीकरण, समुद्रकिनारे आणि समुद्राचे पाणी स्वच्छ ठेवणे या कामांवरही भर देण्यात येणार आहे. प्रशासकीय कारभारातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले असून, या सर्व मुद्द्यांचा समावेश महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.