नवरात्रौत्सवानिमित्त पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; 'हे' रस्ते राहणार बंद
पुणे/अक्षय फाटक : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पुणे शहरातील विविध मंदिरांच्या परिसरात वाहतूक बदल करण्यात आला आहे. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतु:शृंगी मंदिर, भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर, तसेच सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतूकीत बदल केला आहे. या भागातील रस्ते वाहतुकीस बंद केले आहेत, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी कळविले आहे.
नवरात्रोत्सवात बुधवार पेठेतील श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी होते. गुरुवारपासून (३ ऑक्टोबर) अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापर्यंतचा (हुतात्मा चौक) रस्ता वाहतुकीस बंद असणार आहे. बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक दरम्यान एकेरी वाहतूक सुरु राहणार आहे. तर, लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते श्री तांबडी जोगेश्वरी दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे.
सकाळ कार्यालयापासून श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून अन्य वाहनांनासाठी बंद राहील. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसर तसेच शनिवार पेठेतील श्री अष्टभूजा मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई केली आहे. या भागात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी वाहने नदीपात्रातील रस्ता, मंडईतील वाहनतळावर लावावीत.
श्री चतु:शृंगी मंदिर परिसरात गर्दी झाल्यास या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या भागात गर्दी वाढल्यास सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक वेताळबाबा चौकमार्गे दीप बंगला चौक, ओम सुपर मार्केटमार्गे वळविण्यात येणार आहे. भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात आला आहे. नेहरु रस्त्याने श्री भवानी माता मंदिराकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. नेहरु रस्ता ते श्री भवानी माता मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. गर्दी वाढल्यास नेहरु रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.
श्रीसुक्त पठणानिमित्त वाहतूक बदल
श्रीसुक्त पठणानिमित्त शुक्रवारी (४ ऑक्टोबर) सकाळी पाच ते सात दरम्यान सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार असून, स्वारगेटकडून सारसबागमार्गे स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. मित्रमंडळ चौकाकडून पूरम चौकाकडे येणारा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मित्रमंडळ चौकातून येणाऱ्या वाहनांना सावरकर चौकातून सिंहगड रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे, तसेच सिंहगड रस्त्याने सावरकर चौकात येणाऱ्या वाहनांनी लक्ष्मीनारायण चौकातून इच्छितस्थळी जावे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी कळविले आहे.