मयुर फडके, मुंबई : रामनवमीच्या (RamNavmi) दिवशी मुंबईतील (Mumbai) मालवणी परिसरात (Malvani) उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी (Violance) मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) भूमिकेवर संशय व्यक्त करणारी याचिका उच्च न्यायालयात (High Court) दाखल केली आहे. याप्रकरणातील कथित आरोपी आणि सामाजिक कार्यकर्ते जामील मर्चंट यांनी फौजदारी रिट याचिका केली असून त्यावर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.
यंदा ३० मार्च रोजी रामनवमीला मालाड मालवणी येथे हिंसाचार उसळला होता. त्या घटनेनंतर अनेकांवर कारावाई करण्यात आली. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते जामील मर्चंटचाही समावेश आहे. याप्रकरणी मर्चंट यांना दिंडोशी सत्र न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर त्यांनी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मर्चंट यांनी याचिकेत रामनवमीच्या शोभा यात्रेतील पोलिसांची भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात खोट्या वैद्यकीय अहवालाचा आधार घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंसाचारानंतर पोलिसांनी आयपीसीचे कलम १५३ (अ), १२० (ब) आणि ३३३ कलम जोडली ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे याचिकेत म्हटले आहे. मालवणी दंगलीप्रकरणी पोलिसांनी खोट्या अहवालाच्या आधारे एफआयआर दाखल केली आहे.
[read_also content=”क्षणार्धात सुखी संसाराची राखरांगोळी; अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू, भऊर गावावर पसरली शोककळा https://www.navarashtra.com/crime/two-youths-died-in-an-accident-mourning-spread-over-bhaur-village-in-devla-nashik-nrvb-398882.html”]
शोभा यात्रेदरम्यान पोलिसांच्या सांगण्यावरून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, मात्र तरीही पोलिसांनी आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या संदर्भतील सर्व पुरावे म्हणजे घटनेच्या दिवशीची छायाचित्रे, सीसीटीव्ही फुटेज न्यायालयासमोर ठेवली असून तेथे आपण पोलिसांना मदत करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, हे सर्व पुरावे त्यांचे निरपराधित्त्व सिद्ध करण्यासाठी पुरेसे असल्याचा दावाही मर्चंट यांनी केला आहे.
मुंबई पोलिसांचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, डीसीपी अजय बन्सल यांच्यासह एकूण आठ जणांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले असून, याचिकेनुसार या अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले नाही, असा दावाही करण्यात आला आहे.
तसेच पोलिसांनी घटनेनंतर ज्या कलमार्तंगत गुन्हे दाखल केले त्यानुसार, सात वर्षांहून कमी शिक्षेची तरतूद होती. तरीही पोलिसांनी १४४ अंतर्गत नोटीस न बजावता अटक करण्याची घाई का दाखवली? असा प्रश्नही याचिकेत उपस्थित करून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही मर्चंट यांनी केली आहे. तसेच प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून या प्रकरणाची अन्य तपास यंत्रणेकडून चौकशी कऱण्याची मागणीही याचिकेतून कऱण्यात आली आहे.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 13 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-13-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
रामनवमी रोजी मुंबईतील मालवणी भागातील गेट क्रमांक पाचजवळ असलेल्या हजरत अली मशिदीजवळ रामनवमीच्या शोभा यात्रेत दोन समुदायांमध्ये दगड आणि चप्पलफेक झाली. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी या प्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून ३०० ते ४०० जणांना फरार दाखवले तर एकूण २५ हून अधिक जणांना अटक करण्यात आली होती.






