
पुणे : पुण्यात पीएमटी बसच्या (PMT Bus) धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आळंदीहून स्वारगेटला ही बस जात होती. मृत तरुणाचं नाव आकाश विल्सन पिल्ले असं असून तो येरवडा गाडीतळ इथंला रहिवासी होता. या अपघातप्रकरणी पीएमटी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आळंदीहून स्वारगेटला जाणाऱ्या या बसने आकाशच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की आकाशचा मृत्यू झाला. पीएमसी बसच्या चालकाचं नाव अज कामठे असून त्यांच्यावर विश्रांतावडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघात प्रकरणी (Pune Accident News) पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र तरुणाच्या मृत्यूने विश्रांतवाडीवर शोककळा पसरली आहे. मंगळवारी रात्री हा अपघात झाला.
डेक्कन कॉलेज जवळ झालेल्या या भीषण अपघातात आकाश गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला.