माणगाव : सर्वोच्च न्यायालयाने मराठी पाट्यांबाबत निर्णय दिल्यानंतर रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक आक्रमक झाली असून माणगाव शहरातील बाजारपेठेत मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात आले. इंग्रजी भाषेत दुकानावरती लावलेल्या पाट्यांना काळे फासून दोन दिवसात मराठीत पाटी लावण्याची सूचना करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील दुकाने व आस्थापनेवर मराठीत पाटी लावण्यात यावी यासाठी मनसे सुरूवातीपासूनच आग्रही असताना आता थेट सर्वोच्च न्यायालयाने देखील यावरती शिक्कामोर्तब करत मराठी पाटी बंधनकारक असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतरही काही दुकानांवर इंग्रजीत पाट्या लागलेल्या असल्याने मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख देवेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी आक्रमक पावित्रा घेत माणगाव शहरातील बाजारपेठेत धडक देऊन इंग्रजी पाट्यांना काळे फासून जोरदार घोषणाबाजी केली. व्यापारी वर्गाने दोन दिवसात ठळक अक्षरात मराठीत पाटी लावावेत अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा जिल्हाप्रमुख देवेंद्र गायकवाड यांनी दिला आहे.