मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार; शिरोळमधून सरकारला दिला इशारा
शिरोळ : मराठा आरक्षणाची ही अंतिम लढाई आहे. २९ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र मुंबईला धडकणार असून आरक्षणाचा निर्णय लागल्याशिवाय आता थांबणार नाही. एक घर, एक गाडी मुंबईला दाखल होणार असून आता मराठा समाज थांबणार नाही. आमची ताकद पूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे. पुन्हा एकदा ताकद दाखवण्यासाठी मुंबईत या, असे आवाहन मराठा आंदाेलक मनोज जारंगे पाटील यांनी केले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. २९ तारखेला मराठा समाज मुबईत जाणार असल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.
शिरोळ येथील घोंगडी बैठकीत ते बाेलत हाेते. मराठा आरक्षणा संदर्भात २९ ऑगस्टला मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ येथे घोंगडी बैठक झाली. प्रारंभी सकल मराठा समाज व शिरोळकरांच्या वतीने जरांगे-पाटील यांचे स्वागत करण्यात आले. स्वागत दीपक पाटील यांनी तर प्रास्ताविक जयश्री पाटील यांनी केले. माजी आमदार उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने आम्ही सधन आहोत, असे न समजता आरक्षणासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. ५८ लाख मराठा समाज कुणबी सापडला आहे. अजून तीन कोटी मराठा समाजाला कुणबी दाखले मिळतील. याचा फायदा नक्कीच समाजाला होणार आहे. शिरोळकरांच्या दाखल्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. २९ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज मुंबईत दाखल होणार आहे. आंदोलन यशस्वी होईपर्यंत माघार नाही. या आंदोलनामुळे समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक प्रगतीला आता कोणीही अडवू शकणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
यावेळी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे, ‘आंदोलन अंकुश’चे संस्थापक धनाजी चुडमुंगे, मुस्तफा इनामदार, राकेश जगदाळे, कृष्णा देशमुख, मंगेश नलवडे, एकनाथ माने, सचिन गावडे, विकास सेसावरे, अनिल हुपरीकर, रणजीत महाडिक, दत्तात्रय जगदाळे अक्षय पाटील यांच्यासह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा-ओबीसी संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न
जरांगे-पाटील म्हणाले, फडणवीस सरकार मराठा-ओबीसी असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र असे झाल्यास फडणवीस यांना आमची ताकद दाखवून देऊ. मराठा समाजावर ओबीसी समाजाला भडकून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यांना त्यांची जागा दाखवू.
तालुक्यातील ५२ गावे पिंजून काढणार
२९ ऑगस्टला मनोज जरांगे-पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला जाण्यासाठी संपूर्ण तालुक्यातून बैठका घेऊन जागृती करणार आहे. तालुक्यातील ५२ गावे पिंजून काढून प्रत्येक मराठा बांधवांना आंदोलनाचे महत्त्व पटवून देऊन मुंबईचे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार सकल मराठा समाज शिरोळच्या वतीने बैठकीत घेण्यात आला.
मराठा समाजातील प्रत्येक घरातून एक गाडी २९ ऑगस्टला मुंबईला येणे गरजेचे आहे. कोणतेही सणवार व आपले काम बाजूला ठेवून समाजासाठी एक दिवस मुंबईला या. तेथून पुढील आंदोलन मी यशस्वी करून दाखवतो.
-मनाेज जरांगे पाटील, मराठा आंदाेलक