'मुंबईत जाळपोळ किंवा दगडफेक करू नका'; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन
जालना : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. निवडणुकीनंतर महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वादंग निर्माण झाला आहे. यामध्ये आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे मागील दोन वर्षांपासून सुरु असलेला मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा सुरु होणार आहे. मात्र आणखी एका नेत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मागील दोन वर्षांपासून मराठा आऱक्षणासाठी उपोषण, आंदोलन व दौरे केले आहेत. महायुती सरकारवर त्यांनी जोरदार निशाणा देखील साधला. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला होता. यानंतर मात्र महायुतीचे राज्यामध्ये पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुढील नवीन वर्षी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी या त्यांच्या गावी पुन्हा एकदा उपोषणावर बसण्याचा निर्णय घेतलेला आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे. जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला गांभीर्याने घेतले नाही तर काय होत हे त्यांना चांगलंच माहिती आहे. सत्तेमध्ये असाल आणि बलाढ्य असाल मात्र मराठ्यांसमोर सत्ता टिकत नाही. 25 जानेवारीच्या आधी आरक्षण दिलं नाही तर सळो की पळो करुन सोडणार आहे. आमच्यामध्ये यांना सरळ करण्याची ताकद आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा विषय यांनी पूर्ण केला पाहिजे. नाही केला तर 25 जानेवारीनंतर महाराष्ट्राच्या घराघरातील मराठा जागा होणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारी पासून उपोषणाचा इशारा दिलेला असला तरी देखील त्यांना ओबीसी नेत्यांनी खुले आव्हान दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले तर आम्ही देखील अंतरवालीमध्ये उपोषण करु असा इशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिला आहे. नवनाथ वाघमारे म्हणाले की, जर जरांगे पाटील उपोषणाला बसणार असतील तर आम्ही सुद्धा आंतरवाली सराटीतच त्यांच्या उपोषणा शेजारीच उपोषणाला बसणार आहे. मनोज जरांगे शरद पवारांच्या सांगण्यावरून उपोषणाला बसतील परंतु आता मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहणार नाही, जरांगे आता एकटे पडले आहेत कारण त्यांनी समाजाच्या मुलांचे भविष्य अंधारात ढकलले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मराठा समाज जरांगेंच्या पाठिशी उभा राहिला तर याचा त्यांना मोठा फटका बसू शकतो असा आक्रमक पवित्रा ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी घेतला आहे.