
इचलकरंजीत काँग्रेसला मोठा धक्का; शहर अध्यक्षासह 'हे' बडे नेते पराभूत
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने स्थानिक आघाड्यांना घेऊन शिव, शाहू आघाडीची स्थापना केली होती. कप बशी या चिन्हावर निवडणूक लढवण्यात आली होती. भाजपमधील नाराज गटाचा फायदा आघाडीला होईल, असा अंदाज बांधण्यात आला होता मात्र निकालानंतर तो फोल ठरला.
निवडणुकीपूर्वी काँग्रेसकडून म्हणजेच शिव, शाहू आघाडीतर्फे इचलकरंजीत चांगल्या कामगिरीचे दावे केले जात होते. काही प्रभागांमध्ये पारंपरिक मतदारसंघ, जुने कार्यकर्ते आणि अनुभव संपन्न माजी नगरसेवक यांच्यावर पक्षाचा मोठा भर होता. मात्र प्रत्यक्ष मतदानात मतदारांनी बदलाची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले. शहर काँग्रेस अध्यक्षांचा पराभव हा केवळ वैयक्तिक नसून, तो पक्षाच्या शहरस्तरीय नेतृत्वाला दिलेला स्पष्ट संदेश मानला जात आहे.
काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजय कांबळे हे निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. एका पत्रकार परिषदेत कांबळे गैरहजरही होते, त्यानंतर त्यांची नाराजी पक्षाने दूर केल्याची चर्चा ऐकाण्यास मिळाली. या निवडणुकीत स्थानिक मुद्दे, उमेदवारांची स्वीकारार्हता आणि अंतर्गत गटबाजी हे निर्णायक ठरल्याचे चित्र आहे. अनेक प्रभागांमध्ये आघाडीचे उमेदवार एकमेकांविरोधातच काम करत असल्याची चर्चा होती. काही ठिकाणी बंडखोरी, तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांची उदासीनता उघडपणे दिसून आली. याचा थेट फटका मतदानाच्या दिवशी आघाडीला बसल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
दुसरीकडे विरोधी पक्षांनी आक्रमक प्रचार, संघटनात्मक बांधणी आणि प्रभागनिहाय रणनीती आखत मतदारांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. तरुण उमेदवार, स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका आणि सातत्याने संपर्क ठेवणारी प्रचारयंत्रणा यामुळे आघाडीच्या पारंपरिक मतांमध्येही फूट पडल्याचे दिसून आले.
निवडणुकी दरम्यान लक्ष्मी दर्शन मोठ्या प्रमाणात झाले याचाही फटका शिव, शाहू आघाडीला बसण्याची चर्चा ऐकावयास मिळत होती. महायुतीने मोठी आर्थिक शक्ती उभी केली होती, त्याचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया शिवशाही आघाडीच्या गोठातून देण्यात आली आहे.
या पराभवामुळे इचलकरंजीतील काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आगामी जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करणे, नव्या नेतृत्वाला संधी देणे आणि अंतर्गत मतभेद दूर करणे गरजेचे ठरणार आहे. अन्यथा इचलकरंजीत काँग्रेसची पकड आणखी कमजोर होण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यात भाजपची जोरदार मुसंडी; प्रभाग क्रमांक ३३ (क) मधून सुभाष नाणेकर विजयी