
नाट्यमय घडामोडीनंतर अपक्षांची नेत्यांसमोर शरणागती; 3 दिवसात तब्बल...
खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक प्रभाग ११ मधून वसंत लेवे, प्रभाग १५ मधून श्रीकांत आंबेकर यांच्या पत्नी स्वाती आंबेकर, प्रभाग १३ मधून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक दत्तू धबधबे, प्रभाग २१ मधून किशोर पंडित, प्रभाग क्रमांक १२ मधून पोपट कुंभार, प्रभाग १५ ब मधून उदयनराजे यांचे समर्थक अमोल पाटोळे यांच्या पत्नी पल्लवी पाटोळे, प्रभाग १४ ब मधून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक अक्षय गवळी, २१ अ मधून धनंजय पाटील प्रभाग क्रमांक १४ ब मधून नासिर शेख, २१ ब मधून सागर पावशे यांच्या पत्नी रूपाली पावसे इत्यादी दिग्गज चर्चेतल्या नगरसेवकांनी अचानक माघार घेतली.
५ जणांची माघार, ९ उमेदवारांमध्ये होणार लढत
शुक्रवारी नेत्यांची झालेल्या चर्चेनंतर नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेतील अशोक राजाराम मोने, बाळासाहेब पुंडलिक शिंदे, सुहास एकनाथ मोरे, शिवाजी नारायण भोसले, शंकर रामचंद्र माळवदे यांनी माघार घेतली. त्यामुळे येथे १४ उमेदवारांपैकी ५ जणांनी माघार घेतल्याने ९ उमेदवारांमध्ये आता या पदासाठी लढत होणार आहे. नगरसेवक पदासाठी एकूण ३३९ उमेदवारांनी अर्ज भरले होते. गेल्या २ दिवसांमध्ये एकूण १४ उमेदवारांनी २ दिवसात अर्ज माघारी घेतले तर शेवटच्या दिवशी ७० उमेदवारांनी नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नगरसेवक पदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने मनोमिलनाची शिष्टाई यशस्वी झाली आहे.
अपक्षांनी लढाईची शस्त्रे ठेवली खाली
भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही नेत्यांनी ठरवून दिलेल्या नगरसेवकांना निवडून आणण्याच्या दृष्टीने अपक्षांना थांबवणे अत्यंत गरजेचे होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जे आवाहनाला प्रतिसाद देतील त्यांना सांभाळून घेऊ अन्यथा पक्ष कारवाई करू, अशी तंबी दिल्याने अपक्षांनी लढाईची शस्त्रे खाली टाकली. भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक आणण्याच्या दृष्टीने दोन्ही नेत्यांनी केलेल्या राजकीय शिष्टाईला यश येऊन अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी एकूण ७५ जणांनी माघार घेतली. त्यामध्ये नगरसेवक पदाच्या स्पर्धेतील ७० तर नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेतील ५ अशा ७५ जणांनी माघार घेतली.
अपक्षांचे फोन स्विच ऑफ, दबाव तंत्राची फोनाफोनी
शुक्रवार दिनांक २१ रोजी उमेदवारांसाठी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नेत्यांनी मनोमिलनातील उमेदवारांना दगा फटका होऊ नये यासाठी अपक्षांना थेट फोन करून त्यांच्याशी समन्वय चर्चा करणे आणि त्यांना अर्ज माघारीसाठी प्रवृत्त करणे हे तंत्र ठेवले होते. बऱ्याच शिष्टाई यशस्वी झाल्या तर काही अपक्ष फोन स्विच ऑफ करून साताऱ्यातून गायब झाले होते .शाहूपुरीतील चर्चेतील उमेदवार संजय पाटील, तर प्रभाग क्रमांक ५ मधील शिवानी कळसकर हे साताऱ्यातून बाहेर असल्याने तेथील राजकीय प्रयत्नाला यश आले नसल्याची माहिती आहे.
बाळासाहेब खंदारे साताऱ्यात बिनविरोध
भारतीय जनता पार्टीच्या बिनविरोध नगरसेवकांची संख्या आता दोन झाली आहे. आशा पंडित या बिनविरोध झाल्यानंतर भाजपने दुसरे खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक १३ मधून बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक बाळासाहेब खंदारे यांची बिनविरोध नगरसेवक म्हणून निवड झाली आहे. प्रभाग १३ मधून अपक्ष उमेदवार म्हणून दत्तू धबधबे यांनी अर्ज दाखल केला होता. नेत्यांच्या विनंतीला मान देऊन धबधबे यांनी आपला अर्ज माघारी घेतला. त्यामुळे खंदारे यांचा नगरसेवक पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. खंदारे समर्थकांनी साताऱ्यात या बिनविरोध निवडीचा एकमेकांना साखर व पेढे भरून आनंद व्यक्त केला आहे.