इचलकरंजी महानगरपालिकेतील समिकरणे बदलणार, भाजपाची ताकद वाढली; 'या' बड्या नेत्यांचा प्रवेश
इचलकरंजी : दोन माजी उपनगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सचिव यांच्यासह अनेक माजी नगरसेविकांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत या सर्वांचे स्वागत करण्यात आले आहे. या दिग्गजांच्या प्रवेशाने भाजपाला आणखीन बळकटी मिळाली असून, महानगरपालिकेत भाजपाचीच सत्ता येणार हे निश्चित मानले जात आहे.
आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरु झाले आहे. विविध राजकीय पक्षातील अनेक दिग्गज नेते, माजी नगरसेवक-नगरसेविका यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्याच अनुषंगाने मुंबईतील भाजपा कार्यालयात मंगळवारी माजी उपनगराध्यक्ष अजितमामा जाधव, रवी रजपुते, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव विठ्ठल चोपडे, माजी नगरसेविका शुभांगी माळी, दीपाली हुक्किरे, माजी नगरसेवक तानाजी हराळे, श्रीकांत कांबळे, राजू खोत यांच्यासह प्रधान माळी, सचिन हुक्किरे, रवी कांबळे, विष्णु नाकिल आदींनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. या सर्वांच्या गळ्यात पक्षाचा स्कार्फ घालून भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. आगामी महापालिकेवर भारतीय जनता पार्टी महायुतीचाच झेंडा फडकणार व पहिला महापौर आपलाच असेल असा दृढ विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली गतीमान झाल्या असून, अनेक दिग्गज मंडळींनी भाजपात प्रवेश केला असून, अद्यापही अनेक माजी नगरसेवक-नगरसेविका यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते संपर्कात आहेत. या सर्वांचाही भाजपा प्रवेश लवकरच होणार आहे, असे आमदार राहुल आवाडे यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक तथा जिल्हा कोअर कमिटी सदस्य सुनिल पाटील, चंद्रकांत पाटील, राजगोंडा पाटील, सुभाष बलवान, रफिक खानापुरे आदी उपस्थित होते.