Maharashtra Breaking News
22 Aug 2025 10:25 AM (IST)
बॅटग्राऊंड गेम फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्ससाठी आजचे म्हणजेच 22 ऑगस्टचे रेडिम कोड्स जारी करण्यात आले आहेत. या रेडिम कोड्सच्या मदतीने आज प्लेअर्सना वेगवेगळ्या आऊटफिट्सच्या मदतीने त्यांचा लूक एन्हांस करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच पेट्सची ताकद वाढवण्याची संधी देखील आज प्लेअर्सना मिळणार आहे. जर तुम्ही देखील फ्री फायर प्लेअर्स असाल आमि तुम्हाला आऊटफिट आणि पेट्स मोफत जिंकायचे असतील तर तुम्ही आजच्या रेडिम कोड्सचा वापर करू शकता. बातमी सविस्तर वाचा...
22 Aug 2025 10:14 AM (IST)
आजकाल भारतात अनेक वेगवेगळ्या लीग खेळल्या जात आहेत, त्यापैकी एक म्हणजे यूपी टी२० लीग २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये मेरठ मॅव्हेरिक्स आणि गौर गोरखपूर लायन्स यांच्यात ९ वा सामना खेळला गेला. या सामन्यात मेरठ मॅव्हेरिक्सकडून फलंदाजी करताना कर्णधार रिंकू सिंगने शतक झळकावले. फलंदाजीदरम्यान रिंकूने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. ज्यामुळे मेरठ मॅव्हेरिक्सने ६ विकेट्सने सामना जिंकला.
22 Aug 2025 09:50 AM (IST)
गोंदिया : जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. तालुक्यातील पाथरी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.20) दुपारच्या सुमारास घडली. 10 ते 11 वयोगटातील मुलींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
22 Aug 2025 09:44 AM (IST)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक अनोखे आणि आपल्याला थक्क करणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे अनेकदा अशा काही दुर्लभ गोष्टीही शेअर केल्या जातात ज्या आपण याआधी कधीही पहिल्या नसतील. अशीच एक घटना आता इथे शेअर करण्यात आली आहे जिने सर्वांनाच थक्क करून सोडले आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात मंदिराच्या शिखरावर चिमुकला पांढरा घुबड विराजमान झाल्याचे दिसून आले. ‘श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विश्व भूषण मिश्रा यांनी त्यांच्या अधिकृत हँडलवरून शेअर केले असून ते आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
22 Aug 2025 09:39 AM (IST)
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंटमधील डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स हेड चंदन टपारिया यांनी आज गुंतवणूकादारांना एक्साइड इंडस्ट्रीज , कमिन्स इंडिया आणि एल अँड टी फायनान्सचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी आज गुंतवणूकादारांना १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये सेंट्रम कॅपिटल , डीसीडब्ल्यू आणि जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस यांचा समावेश आहे.
22 Aug 2025 09:33 AM (IST)
भारताच्या संघ पुढील स्पर्धा ही आशिया कप 2025 खेळणार आहे. टीम इंडियासाठी ही स्पर्धा फार महत्वाची असणार आहे. बीसीसीआयने ही आशिया कपसाठी भारताच्या संघाची घोषणा केली होती. यामध्ये भारताच्या संघाचे नेतृत्व सुर्यकुमार यादव करताना दिसणार आहे. तर भारताच्या संघाचे उपकर्णधारपद हे शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. आशिया कप २०२५ ९ सप्टेंबरपासून दुबई आणि अबू धाबी येथे सुरू होणार आहे.
22 Aug 2025 09:28 AM (IST)
22 ऑगस्ट रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,076 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,231 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,553 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,310 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,00,760 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 75,530 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 116.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,16,100 रुपये आहे.
22 Aug 2025 09:23 AM (IST)
भारतच नव्हे तर जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक थायलँडला भेट देतात. भारतासह जवळपास 93 देशांच्या नागरिकांना थायलँडमध्ये व्हिसाशिवाय पर्यटनाची संधी उपलब्ध आहे. आता या सोयीबरोबरच थायलँड सरकार पर्यटकांसाठी आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे – मोफत देशांतर्गत विमान प्रवास योजना. थायलँडचे पर्यटन व क्रीडा मंत्री सोरावोंग थिएनथोंग यांनी आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी मोफत देशांतर्गत विमानसेवेसाठी 700 मिलियन थाई बाट इतक्या निधीचा प्रस्ताव सादर केला आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे फक्त राजधानी व मुख्य पर्यटन शहरांपुरते न थांबता, पर्यटकांना देशातील इतर भागांमध्येही आकर्षित करणे.
22 Aug 2025 09:18 AM (IST)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना खेळवण्यात आला होता यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बाजी मारली होती. सध्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडे या मालिकेची आघाडी आहे. संघाने पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज या मालिकेचा दुसरा सामना खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय यावेळी हा सामना नवीन स्थळ मॅके येथे होणार आहे.
22 Aug 2025 09:13 AM (IST)
वर्धा : पुलगावमध्ये वाढत्या चोरीच्या घटना पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी हरिराम नगर येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात झालेल्या चोरीच्या घटनेत लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली. असे असताना आता चक्क भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते यांच्या घरी चोरी झाल्याचे गुरुवारी (दि. २१) उघडकीस आले.
22 Aug 2025 09:07 AM (IST)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच दोन आठवड्यांपासून ते आजपर्यंत राज्यातील 19 जिल्ह्यातील 187 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पीकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
22 Aug 2025 09:00 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या जनतेसाठी मोठं गिफ्ट देणार आहेत. ते शुक्रवारी NH-31 वर 8.15 किलोमीटर लांबीच्या औंटा-सिमरिया पुल योजनेचे उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पात पवित्र गंगानदीवरील 1.865 किलोमीटर लांबीचा सहा पदरी मार्गिकेचा पुल समाविष्ट आहे. या प्रकल्पाचे एकूण बजेट सुमारे 1,870 कोटी रुपये आहे. हा पुल मोकामा आणि बेगुसराय या दोन्ही शहरांना थेट जोडेल, ज्यामुळे वाहतुकीची सोय आणि स्थानिक संपर्क सुधारण्यास मदत होईल.
22 Aug 2025 08:55 AM (IST)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे यांच्यावर आरोप केले आहेत. “हा जो कोणी महाराज आहे त्याला मी महाराज असं म्हणणार नाही. कीर्तनकार भंडारे तालुक्याचं नुकसान करतोय.” संगमनेरमध्ये घेतलेल्या सभेत थोरत यांनी भंडारे यांचे थेट व्हिडीओ दाखवले आणि त्यांचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटोही जनतेलाही दाखवले. थोरात यांच्या या वक्तव्यानंतर भंडारे यांनी सोशल मीडियावरून बाळासाहेब थोरात यांना धमकी दिली, “आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल.” या धमकीचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. यामुळे आज संगमनेरमध्ये शांती मोर्चा काढण्यात आला. यापूर्वी, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी गावात हरिनाम सप्ताहादरम्यान झालेल्या वादाच्या प्रकरणी आठ ते दहा कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
22 Aug 2025 08:45 AM (IST)
भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी गोलंदाज गोहर सुल्ताना यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यचा निर्णय जाहीर केला आहे. 37 वर्ष वयाच्या गोहरने हा निर्णय घेतला असून, गेल्या 11 वर्षांपासून टीम इंडियापासून दूर असल्यामुळे निवृत्ती अपेक्षित होती. गोहरने ही घोषणा इंस्टाग्रामवरून केली. याआधी भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही त्यांच्या निवृत्तीची माहिती इंस्टाग्रामवरून दिलेली आहे.
22 Aug 2025 08:35 AM (IST)
आयटी क्षेत्रात नोकरकपातीची चिंताजनक लाट सुरूच आहे. 2025 मध्ये आतापर्यंत तब्बल 176 कंपन्यांनी 80 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. भारतामध्ये सध्या 73 लाखांहून अधिक आयटी कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार लटकतेय. 2024 मधील आकडेवारीदेखील या क्षेत्रातील नोकरकपातीची दाहकता स्पष्ट करत आहे. तज्ज्ञांच्या मते, बदलते बाजारपेठेचे स्वरूप, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर आणि कंपन्यांच्या खर्चकपातीच्या धोरणांमुळे रोजगारावर मोठं संकट ओढवलं आहे.
22 Aug 2025 08:30 AM (IST)
शहरातील येरवडा परिसरात गुरुवारी संध्याकाळी अनोखा प्रकार घडला. शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मध्यभागी "मानवी सांगाडा" पडलेला दिसताच परिसरात खळबळ उडाली. रहदारीच्या गजबजाटामुळे काही वाहनं थेट सांगाड्यावरून गेली, तरीही अनेकांनी हा प्रकार पाहून तातडीने पोलिसांना कळवले.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सांगाडा ताब्यात घेतला. सुरुवातीला तो खरा मानवी सांगाडा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र तपासाअंती पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. हा सांगाडा प्रत्यक्षात प्लास्टर ऑफ पॅरिस आणि तारेचा वापर करून तयार केलेला बनावटी सांगाडा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणामुळे काही वेळ पोलिसांची धांदल उडाली होती. अखेर खरा मानवी सांगाडा नसल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
22 Aug 2025 08:25 AM (IST)
आगामी गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातून हजारो नागरिक कोकणात गावी जाण्यासाठी निघतात. या गर्दीचा अंदाज घेऊन यंदा तब्बल ३८० गणेशोत्सव विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
22 Aug 2025 08:20 AM (IST)
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव आणि महायुतीच्या पॅनलने मोठा विजय मिळवला. या निकालानंतर अवघ्या २४ तासांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानाकडे वळला. राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेत तासभर चर्चा केली. मात्र या भेटीच्या टायमिंगमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत म्हणाले, “गणपतीचं आमंत्रण देण्यासाठीच ही भेट झाली असावी,” असा टोला त्यांनी लगावला.
22 Aug 2025 08:15 AM (IST)
ऑनलाईन गेमिंग विधेयक 2025 संसदेत मंजूर झालं आहे. लोकसभेत पारित झालेलं हे विधेयक काल (21 ऑगस्ट) राज्यसभेतही मंजूर करण्यात आलं. पुढील टप्प्यात हे विधेयक राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येणार आहे. विधेयक मंजूर होताच अनेक ऑनलाईन गेम्सनी ‘रिअल-मनी गेम्स’ तातडीने थांबवले आहेत. ड्रीम-11, रमी, पोकर यांसारख्या लोकप्रिय ऑनलाईन गेम्सवर बंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे ड्रीम-11 सध्या भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रायोजक आहे. सरकारच्या मते, पैशांच्या देवाणघेवाणीवर आधारित गेमिंगमुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होत असून, अशा प्रकरणांमुळे आत्महत्याही झाल्याचं नोंदवलं गेलं आहे. याच पार्श्वभूमीवर हे विधेयक आणण्यात आलं असून, त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर ऑनलाइन गेमिंग क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे.
22 Aug 2025 08:10 AM (IST)
महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांना थेट इशारा दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सांगोल्यातील सभेत बोलताना खोत म्हणाले, “आजवर माझ्या नादाला लागून अनेकजण भेंडाळले, आता तुम्ही आलात काय? शेतकऱ्याने कधीही खिलार किंवा देशी गाईची विक्री केलेली नाही, हा हजारो वर्षांचा इतिहास आहे. तरीही काही लोक गायी अडवतात. मी त्याला विरोध केला तर मला धमकीचे फोन येऊ लागले आहेत. “माझ्या नादाला लागू नका, मी सोबत नांगराचा फाळ आणलेला आहे, तो तुमच्यावर वापरेन,” अशा शब्दांत त्यांनी चेतावणी दिली.
22 Aug 2025 08:04 AM (IST)
मुंबई इंडियन्स फ्रँचायझी परदेशातही आपल्या गुंतवणुकीचा विस्तार करत आहे. काही आठवड्यांपूर्वी एमआय फ्रँचायझीने इंग्लंडच्या लोकप्रिय ‘द हंड्रेड’ लीगमधील ओव्हल इनव्हिन्सिबल्स संघात 49 टक्के हिस्सा खरेदी केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या संघाला आता नवीन नाव मिळणार असून तो पुढील हंगामापासून ‘एमआय लंडन’ या नावाने ओळखला जाईल. यामुळे ओव्हल इनव्हिन्सिबल्स हा मुंबई इंडियन्सच्या मालकीचा सहावा संघ ठरणार आहे. मुंबई इंडियन्सने याआधी आयपीएलसह विविध परदेशी लीगमध्ये संघ खरेदी करून आपले ब्रँड नेटवर्क वाढवले आहे. आता इंग्लंडमधील या मोठ्या गुंतवणुकीनंतर फ्रँचायझीचा विस्तार आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
Marathi Breaking news live updates- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच दोन आठवड्यांपासून ते आजपर्यंत राज्यातील 19 जिल्ह्यातील 187 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पीकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.