Maharashtra Breaking News
20 Aug 2025 10:57 AM (IST)
19 ऑगस्ट 2025 रोजी, राज्यभरात ठिकठिकाणी पावसाचा जोर पाहण्यात आला. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल अनेक तासांसाठी खोळंबली होती. त्यामुळे मुंब ईकरांचे तसेच MMR परिसरातील सर्व जिल्ह्यातील नागरिकांचे मोठे हाल झाले होते. पावसाचा वाढता जोर पाहता या दिवशी मुंबई, ठाण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, दुसरा दिवस उगवला पण पावसाचा जोर मात्र काही कमी झाला नाही. त्या अनुषंगाने राज्यातील काही स्थानिक प्रशासनांनी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी 20 ऑगस्ट 2025 रोजी शाळा बंद राहणार असून तर काही ठिकाणी 21 ऑगस्ट रोजी ही शाळा बंद राहणार आहेत. वाचा सविस्तर
20 Aug 2025 10:50 AM (IST)
सुंदर त्वचेसाठी चांगला आहार आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. याशिवाय आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पोषण आहार घेणे गरजेचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी तरुण दिसण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. वाचा सविस्तर
20 Aug 2025 10:50 AM (IST)
सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मोरबे धरण परिसरातील पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून आज पहाटे 3.10 वाजता धरणाचे 12 मी. × 3 मी. आकाराचे दोन्ही वक्राकार दरवाजे 25 सेंटीमीटरने उघडण्यात आले. या अंतर्गत 1123 क्युसेक पाण्याचा विसर्ग धावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार असल्याने नागरिकांनी नदीपात्रात न उतरता सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेने केले आहे. दररोज 450 दशलक्ष लिटर क्षमतेचे हे मोरबे धरण आता पूर्ण क्षमतेने (88 मीटर) भरलेले असून नवी मुंबईच्या जलसंपन्नतेत मोठी वाढ झाली आहे.
20 Aug 2025 10:46 AM (IST)
उजनी आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. आज सकाळी पंढरपुरातील चंद्रभागा नदीमध्ये 22 हजाराहून अधिक क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. चंद्रभागा नदीपात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर साधुसंतांच्या समाधीना पाण्याने वेढा दिला आहे. आज सायंकाळपर्यंत पंढरपुरात पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना व स्थानिक नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सध्या उजनी धरणातून 75 हजार तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये 54 हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
20 Aug 2025 10:45 AM (IST)
गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील कल्पना आनंद डुकरे (वय ३०) या सात महिन्याच्या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आवश्यक वैद्यकीय सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूर रुग्णालयात नेत असतानाच गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर रुग्णवाहिकेत या महिलेची प्रसूती झाली. यामध्ये आई सुखरूप राहिली आहे. मात्र, दुर्दैवाने बाळाचा मृत्यू झाला.
20 Aug 2025 10:40 AM (IST)
बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणुकीसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान झाले. मंगळवारी मतमोजणी प्रस्तावित होती, परंतु मुसळधार पावसामुळे उशिरा सुरू झाली आणि रात्री उशिरा निकाल जाहीर झाले. बेस्ट पतपेढीच्या एकूण २१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शशांकराव पॅनलने १४ जागा जिंकल्या. त्याच वेळी महायुती समर्थित सहकार समृद्धी पॅनलने ७ जागा जिंकल्या. तर ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलचा पूर्णपणे सफाया झाला असल्याचं दिसून आले आणि इतकंच नाही तर उत्कर्ष पॅनलला ० जागा मिळाल्या आहेत. अगदीच अपमानास्पदरित्या ही जोडी हरल्याचं आता समोर आलं आहे. वाचा सविस्तर
20 Aug 2025 10:35 AM (IST)
९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. हॉकी आशिया कप स्पर्धेतून पाकिस्तान संघाने माघार घेतली आहे. हॉकी आशिया कप २०२५ ही स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान खेळवली जणार आहे. भारताला हॉकी आशिया कपचे यजमानपदाचा मान मिळाला असून देशाने या स्पर्धेचे यजमानपद बिहार राज्याकडे दिले आहे. परंतु, या स्पर्धेत पाकिस्तान हॉकी आशिया कपसाठी भारत दौरा करणार नसल्याची अधिकृत माहिती हाती आली आहे. एवढेच नाही तर ओमानने देखील आपले नाव मागे घेतले आहे. अशा परिस्थितीत बांगलादेश आणि कझाकस्तानला संधी देण्यात आली. वाचा सविस्तर
20 Aug 2025 10:33 AM (IST)
सोशल मीडियावर सध्या एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो सर्वांचाच थरकाप उडवत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक शेतातील दृश्य दिसून येत आहे. हे दृश्य इतके हैराण करणारे आहे की त्याने कुणाचेही हातपाय थरथर कापू शकतात. व्हिडिओमध्ये दिसतंय की शेकडो आणि हजारो साप शेतात इकडे तिकडे रेंगाळत आहेत, जणू काही साप पिकं नाही तर शेती करत आहेत. साप जेसीबी मशीनवरही चढले आहेत आणि पुढे जाताना त्याला चिकटून आहेत. काही साप मशीनच्या बोनेटवर पोहोचले आहेत आणि केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दृश्य इतके भयानक आहे की ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
20 Aug 2025 10:16 AM (IST)
पुणे: यंदाच्या पावसाळी हंगामात पुण्यातील सर्व प्रमुख धरणे १०० टक्के भरली गेली आहेत. यापैकी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चार धरणे १०० टक्के भरली आहेत. खास बाब म्हणजे, खडकवासला धरणातून सध्या मुठा नदीसाठी ३९ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्याची तयारी करण्यात आली आहे. या विसर्गामुळे मुठा नदीच्या पातळीमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे जलसंपत्तीची भरपाई झाली आहे.
20 Aug 2025 09:55 AM (IST)
Maharashtra Rain Update: गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अजून दोन-तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवा आहे. पावसाचा जोर पाहता राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. तसेच शाळांना सुट्ट्याही जाहीर करण्यात आल्या आहेत.
20 Aug 2025 09:50 AM (IST)
हवामान खात्याने महाराष्ट्रातील पालघर, मुंबई उपनगरे, मुंबई शहर, ठाणे, पुणे आणि रायगड येथे मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. यापूर्वी विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता, परंतु आता पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात पाऊस आणि पूर संबंधित घटनांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात पूरसदृश परिस्थितीमुळे ५ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. राज्याच्या विविध भागात ६ एसडीआरएफ पथकांसह एकूण १८ एनडीआरएफ पथके तैनात आहेत. ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. ठाणे, भिवंडी, पालघर येथील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
20 Aug 2025 09:45 AM (IST)
Asia cup 2025 : मंगळवारी, १९ ऑगस्ट रोजी, बीसीसीआयकडून आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाच्या १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला. सूर्यकुमार यादव आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संघ निवडीबाबत माहिती दिली. सूर्यकुमार यादवकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे तर शुभमन गिलल उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याच वेळी, रिंकू सिंग, हर्षित राणा, सुज सॅमसन आणि जितेश शर्मा सारख्या खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु, चँपियन ट्रॉफी असो वा आयपीएल २०२५ या दोन्ही स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून देखील आशिया कपसाठी त्याचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे निवडकर्त्यांवर अनेकांनी रोष व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये आता टीम इंडियाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर याने देखील संघाच्या निवडीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
20 Aug 2025 09:40 AM (IST)
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. सध्या पुण्यासह मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच असून, अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. या मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेला मोठा फटका बसला आहे. ठाण्यात पडणाऱ्या या पावसामुळे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. रेल्वेगाड्या अर्धा तास उशिराने धावणार आहेत.
20 Aug 2025 09:35 AM (IST)
20 ऑगस्ट रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,074 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,234 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,555 रुपये आहे. 19 ऑगस्ट रोजी काल भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,117 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,274 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,588 रुपये होता. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,340 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,00,740 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 75,550 रुपये आहे.
20 Aug 2025 09:31 AM (IST)
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सिव्हिल लाईन्स येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
20 Aug 2025 09:30 AM (IST)
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील नेरी येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून चक्क फाटक्या नोटा निघाल्या. हा प्रकार सोमवारी (दि. १८) घडला. एका ग्राहकाने एटीएममधून पैसे काढून मोजू लागला. तेव्हा तो अवाक् झाला, कारण एटीएममधून चक्क 500 रुपयांच्या 18 नोटा फाटक्या निघाल्या आणि सदर बाब लोकांना सांगताच एकच खळबळ उडाली.
20 Aug 2025 09:23 AM (IST)
पुणे : मागील दोन-तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले आहे. सध्या पुण्यासह मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच असून, अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांना पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
20 Aug 2025 08:44 AM (IST)
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाने काहीशी उसंत दिल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. काल (१९ ऑगस्ट) दिवसभर झालेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट असून धोका पातळी ४३ फूट आहे. यामुळे जिल्ह्यातील ८५ बंधारे पाण्याखाली गेले असून, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग वापरणे भाग पडलं आहे. कोल्हापूर–गारगोटी मार्गावरील मडिलगे भागात पाणी आल्यामुळे हा मार्ग तात्पुरते वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. राधानगरीतील सात स्वयंचलित दरवाजांपैकी पाच दरवाजे बंद केल्याने मोठा दिलासा मिळाला असून, सध्या केवळ दोन दरवाजांमधून विसर्ग सुरु आहे.
20 Aug 2025 08:41 AM (IST)
गेल्या २४ तासांत मुंबईतील अनेक भागात २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला, ज्यामध्ये पूर्व उपनगरातील विक्रोळी येथे सर्वाधिक २५५.५ मिमी पाऊस पडला. सांताक्रूझ वेधशाळेत २३८.२ मिमी पावसाची नोंद झाली, तर कुलाबा वेधशाळेत ११०.४ मिमी पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ वेधशाळे पश्चिम उपनगरांसाठी हवामान माहिती गोळा करते आणि कुलाबा वेधशाळेत दक्षिण मुंबईसाठी हवामान माहिती गोळा करते. आयएमडीने म्हटले आहे की विक्रोळीमध्ये सर्वाधिक २५५.५ मिमी पाऊस पडला, त्यानंतर भायखळा येथे २४१ मिमी, जुहू येथे २२१.५ मिमी आणि वांद्रे येथे २११ मिमी पाऊस पडला.
20 Aug 2025 08:39 AM (IST)
पर्यटन शहर लोणावळ्याने पावसाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या २४ तासांत एकूण ४३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस असल्याचे म्हटले जाते. काल दहा तासांत १५० मिमी पाऊस नोंदला गेला होता, जो पुढील चौदा तासांत आणखी वाढला आणि २८२ मिमी पाऊस नोंदला गेला. यामुळे २४ तासांत एकूण ४३२ मिमी पाऊस नोंदला गेला आहे. या हंगामात आतापर्यंत ४८१० मिमी पाऊस नोंदला गेला आहे.
20 Aug 2025 08:37 AM (IST)
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात पाऊस आणि पूर संबंधित घटनांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात पूरसदृश परिस्थितीमुळे ५ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. राज्याच्या विविध भागात एसडीआरएफच्या ६ पथकांसह एनडीआरएफच्या एकूण १८ पथके तैनात आहेत.
20 Aug 2025 08:35 AM (IST)
मुंबईत आज दुपारी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पालघर आणि नाशिकमधील घाट परिसरात विशेषतः जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. नागरिकांनी या भागात काळजी घेणे आवश्यक आहे. आज सकाळपर्यंत, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, पुणे घाट, नाशिक घाट आणि चंद्रपूर या भागांमध्ये रेड अलर्ट जाहीर केला गेला आहे. तसेच, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, गडचिरोली, धुळे, वर्धा, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
Marathi Breaking news live updates- राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांना आधीच सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गरज असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडण्यास टाळावे, असेही सांगितले आहे. राज्यातील विविध ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आज पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे.