छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने जनावरांचा चारा प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध व्हावा, याकरिता जिल्ह्यात चारा बंदी सुरू केल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. जिल्ह्यातील चारा जिल्ह्यातच राहावा याकरिता, जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात चारा नेण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, 11 एप्रिलपासून बाहेरच्या जिल्ह्यात चारा घेऊन जाण्यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणांहून चारा छावणीबाबत विचारणा केली जात आहे. मात्र त्यामधे राजकीय हस्तक्षेप आणि त्याबाबत राजकारण पाहून सत्य परिस्थितीचा आधार घेऊन प्रस्ताव तयार केले जात आहेत. दुसरीकडे पाणी टंचाईबाबत दररोज आढावा घेतला जात आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील टँकर संख्या एक हजारांहून अधिक जास्त आहे.
यंदा कमी पर्जन्यमान झाल्यानं मराठवाडा भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे. पुन्हा एकदा मराठवाड्यातील जनतेला टँकरवर तहान भागवण्याची वेळ आली आहे. त्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा भीषण अडचण निर्माण होण्याची शक्यता आहेत. त्यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाय योजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील जनावरांच्या चाऱ्याबाबत टंचाई निर्माण होऊ नये, याकरिता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी चारा वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत.