वाडी : एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide by Hanging) केल्याची घटना वाडी पोलिस स्टेशन अंतर्गत आठवा मैल पालकर नगर येथे घडली. प्रणाली ऊर्फ डॉली सुशील घोडेस्वार (वय 24) असे या विवाहित महिलेचे नाव आहे. प्रणालीने आपल्या राहत्या घरीच बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्रणाली घोडेस्वार ही आठवा मैल येथील पालकर नगरात पती सुशील घोडेस्वार यांच्यासह कुटुंबियांसोबत राहत होती. तिचे पती सुशील हे ऑर्डनन्स फॅक्टरी येथे कामाला आहेत. प्रणाली हिने रविवारी सकाळी साडे नऊ ते दहाच्या दरम्यान राहत्या घरी फॅनला ओढणीच्या सहायाने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेच्या वेळी पती सुशील घोडेस्वार हे घरी नव्हते. घरी सासरे व घरकाम करणारी बाई नेहमीच्या कामात व्यस्त होती.
प्रणाली सासरे जयप्रकाश घोडेस्वार यांना सांगून बेडरुममध्ये गेली. बराच वेळ झाला तरी सूनबाई बाहेर का येत नाही म्हणून सासऱ्याने तिला हाक मारली. काहीच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून हे सासऱ्यांनी दार उघडून आत बघितले तर सदर घटना लक्षात आली. आधी शेजाऱ्यांना बोलावून मृतक प्रणालीच्या पतीला फोन करुन बोलावण्यात आले.
चक्कर येत असल्याचा पतीला फोन
पती सुशीलने सांगितले की, प्रणालीने सकाळी फोनवरून सांगितले की थोडी चक्कर आल्यासारखे वाटत आहे. यावर पतीने तिला वेळेवर औषध घेऊन विश्रांती कर, असे म्हटले. पण नंतर तिने आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे.