
मसूर ग्रामपंचायतीची गाळे ताब्यात घेण्याची धडक कारवाई; पोलिसांच्या तत्परतेने तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात
मसूर : मसूर ग्रामपंचायतीच्या मालकीचे व्यापारी गाळे बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल्याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित गाळे आपल्या ताब्यात घेतले व गाळे सील केले. या कारवाईदरम्यान काही व्यक्तींनी शासकीय कामात अडथळा आणण्याचा व कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मसूर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणत संपूर्ण कारवाई शांततेत पूर्ण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीच्या मालकीचे व्यापारी गाळे बेकायदेशीरपणे ताब्यात असल्याप्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या कारवाईमुळे ग्रामपंचायतीच्या मालमत्तेवरील अनधिकृत ताब्याविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले. शासकीय मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
पोलिसांची तत्परता; तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात
ग्रामपंचायत प्रशासक ए. टी. बर्गे व ग्रामविकास अधिकारी बालाजी मेढेवार यांनी पंचांच्या उपस्थितीत रीतसर पंचनामा करून संबंधित व्यापारी गाळे ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेण्याची कारवाई केली. ही कारवाई कायदेशीर व पारदर्शक पध्दतीने पार पाडावी यासाठी ग्रामपंचायतीने पूर्वनियोजन करून मसूर पोलीस ठाण्याकडून सशुल्क पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. कारवाई सुरू असताना काहींनी शासकीय कामात अडथळा निर्माण करत अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याचे सांगण्यात आले.
परिसरात नागरिकांची मोठी गर्दी
बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मसूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप केला. अतिरिक्त पोलीस मदत मागवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले. तसेच शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या तत्पर व संयम भूमिकेमुळे संभाव्य अनुचित प्रकार टळले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश आले.
बाजारपेठेत तीन गाळे बांधण्यात आले
मसूरला पणन महामंडळाच्यावतीने बाजारपेठेत तीन गाळे बांधण्यात आले आहेत. सदरचे गाळे शेतकरी व महिला बचत गटांना चालवण्यास दिला जावा, असा उद्देश होता. पैकी एक काळा ग्रामसभेच्या परवानगीने बचत गटात चालवण्यास दिला आहे. दुसरे दोन गाळे परवानगी न घेता एका गाळ्याचे दोन भाग करून एकच गाळा बेकायदेशीरदृष्ट्या एका राजकीय पक्षाचे कार्यालय म्हणून वापरात होता. या संदर्भात ग्रामपंचायतीच्या दप्तरी करार दिसून येत नव्हता. सदर गाळा राजकीयदृष्ट्या वापरात होता. याबाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती, ग्रामपंचायतीकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तेव्हापासून गाळे वादग्रस्त व बहुचर्चित ठरले होते. ग्रामस्थांच्यातही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
पदाधिकारी व प्रशासन यांच्यात शाब्दिक वाद
माजी उपसरपंच विजयसिंह जगदाळे, माजी सदस्य महेश घाडगे व महेश जगदाळे यांचे व प्रशासनातील अधिकाऱ्यांशी शाब्दिक वाद झडले. गाळा खाली करण्याची नोटीस का दिली नाहीॽ गाळा शील करत आहात त्याचे लेखी द्यावे. आम्ही बेकादशीर गाळा घेतला असेल तर तुम्ही भाडे का घेताॽ आमच्याकडे करार आहेत. आजवर दिलेले भाडे परत द्या. आम्ही गाळा खाली करतो. कोणाच्या दबावाखाली बळाचा वापर करून एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला.