मसूरच्या ग्रामस्थांना कधी मिळणार शुद्ध पाणी (फोटो -istockphoto/टीम नवराष्ट्र)
मसूर: मसूर ता कराड येथील केंद्रशाशित जलजीवन योजनेचे अंतिम टप्प्यातील कामाला अक्षरशः कात्रजचा घाट दाखवला आहे. अत्यंत धीम्या गतीने सुरू असलेल्या योजनेच्या कामामुळे जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांसह ठेकेदाराच्या मनमानीपणामुळे योजना रखडली असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. मसूरकरांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार ? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. योजनेच्या कामामुळे रस्तेही उखडलेले आहेत. विविध तक्रारीसह गाजलेली वादग्रस्त पेयजल योजना मुदत संपूनही कधी मार्गी लागणार ॽ यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
मसूरला राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम अत्यंत धीम्यागतीने सुरू आहे. जलजीवनच्या परिपत्रकानुसार डिसेंबर २०१४ अखेर काम पूर्ण करून योजना ग्रामपंचायतीला वर्ग करणे बंधनकारक होते. त्यास वाढीव निधीच्या नावाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व ठेकेदाराने योजनेच्या कामाला खो घातल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. बहुतांश ठिकाणी अद्याप पाईप पोहोचली नसल्याच्या तक्रारी आहेत.
नळ जोडणीसह मीटर बसवण्याचा व वीज जोडणीचा प्रश्न अध्याप तसाच आहे. यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने अपूर्ण कामाबद्दल वारंवार तक्रारी झाल्या. त्याकडे दुर्लक्ष झाले. या योजनेचे काम पूर्ण झाल्याशिवाय ग्रामपंचायतीला वर्ग करून घेणार नसल्याचा व अंतिम बिल न देण्याचा एकमुखी ठराव ग्रामपंचायत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी, पेयजल योजना कमिटी व ग्रामस्थ. यांच्या संयुक्त झालेल्या बैठकीत झाला आहे. बैठकीला चार महिने उलटले तरी आज अखेर कोणतेही काम झालेले नाही.
अधिकारी व ठेकेदार मिलीभगत ॽ
काम सुरू झाल्यापासून पेयजल कमिटी व ग्रामस्थांनी अनेक तक्रारी व त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत ठेकेदाराने कामे रेटून नेली. याप्रकरणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व ठेकेदार हेच जबाबदार असून दोघांचे मिली भगत आहे का ॽ असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
मसूरमधील रस्ते नको रे…
मसूर मधील पेयजल योजना अंतर्गत पाईपलाईनसाठी रस्ते खुदाई करण्यात आली. पोस्ट गल्ली ते चावडी चौक, चावडी चौक ते खडकपेठ-बसस्थानक चौक, हिंदुराव आबा चौक ते उंब्रज रस्ता. या रस्त्यावरचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण उखडले आहे. रस्त्याचे विद्रुपीकरण झाले आहे. दोन पावसाळ्यात चांगलाच मनस्ताप झाला आहे. या रस्त्यावरून पादाचारी व वाहनधारक जायला ना पसंती दर्शवतात. त्यामुळे मसूरचे रस्ते नको रे…अशा प्रतिक्रिया आहेत.
कृषिपंपांची वीज जोडणी तत्काळ सुरू करा
शासनाकडून शेतीसाठी मोफत वीज मिळत असताना महावितरण कंपनी गोरगरीब शेतकऱ्यांची सोलर सिस्टमसाठी अडवणूक करीत आहे. महावितरणने शेतकऱ्यांवरील हा अन्याय थांबवावा व येत्या १० दिवसांत कृषिपंपांना वीज कनेक्शन द्यावीत. अन्यथा, ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी दिला आहे.
याबाबतचे महावितरणच्या ओगलेवाडी कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात अाले. निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी अल्पभूधारक होत चालला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याकडे सध्या अर्धा ते दोन एकर पर्यंत शेती आहे. कर्ज काढून शेतात विहीर अथवा बोअर पाडत आहे. मात्र, यातील पाणी उपसा करण्यासाठी शेती पंपाला वीज कनेक्शन मागितले तर महावितरण नवीन कनेक्शन देत नाही.