ताम्हिणी घाटात आढळला दुर्मिळ पाहुणा (फोटो- विवेक आंबेरकर)
महाराष्ट्रात आढळला युरेशियन ब्लॅक कॅप मादी
देशात या प्रजातीची ही केवळ दुसरी नोंद
या आधी केरळच्या मुन्नार येथे झालेले दर्शन
पुणे: महाराष्ट्रातील ताम्हिणी घाटात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ या ‘वटवट्या’ कुळातील दुर्मिळ मादी पक्ष्याचे दर्शन झाल्याची नोंद झाली आहे. १० नोव्हेंबर रोजी टिपलेली ही नोंद महत्त्वाची ठरली आहे. देशात या प्रजातीची ही केवळ दुसरी नोंद आहे . यापूर्वी २०२१ मध्ये केरळच्या मुन्नार येथे या नर पक्ष्याचे दर्शन झाले होते.
‘युरेशियन ब्लॅक कॅप’ हा प्रवासी स्थलांतरित पक्षी असून तो प्रामुख्याने युरोपमध्ये प्रजनन करतो आणि हिवाळ्यात दक्षिण युरोप तसेच आफ्रिकेकडे स्थलांतर करतो. त्यामुळे ताम्हिणी परिसरात दिसलेली ही मादी भरकटून भारताच्या दिशेने आली असावी, असा अंदाज पक्षी निरीक्षक आणि पक्षी तज्ञांनी व्यक्त केला आहे.
मुंबईचे पक्षी निरीक्षक विवेक आंबेरकर हे ताम्हिणी घाटातील ‘ताम्हिणी नेचर नेस्ट’ येथे पक्षी निरीक्षणासाठी गेले होते. निरीक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या लपणगृहात बसले असताना साधारण अकराच्या सुमारास कृत्रिम पानवठ्यावर पाणी पीत असलेला एक छोटा अनोळखी पक्षी त्यांच्या नजरेस पडला. नवीन प्रजाती असल्याची शक्यता लक्षात येताच त्यांनी त्याचे छायाचित्र त्वरित टिपले. हे छायाचित्र स्थानिक निरीक्षक रामदास येणपुरे यांना दाखवल्यानंतर दोघांनी मिळून माहिती पडताळली आणि हा पक्षी युरेशियन ब्लॅक कॅपची मादी असल्याचे निश्चित केले. येणपुरे यांनी सांगितले की, मंगळवारीही या दुर्मिळ पक्ष्याने त्याच पानवट्यावर पुन्हा हजेरी लावली होती.
या प्रजातीतील नर आणि मादीमधील मुख्य फरक त्यांच्या डोक्यावरच्या ‘कॅप’च्या रंगात आढळतो. नराची टोपी काळी असते, तर मादीची हलक्या तपकिरी रंगाची. निमवयस्क नरांनाही सुरुवातीला मादीसारखीच तपकिरी टोपी आढळते. ताम्हिणी घाटातील ही नोंद स्थानिक जैवविविधतेच्या दृष्टीने अभ्यासासाठी महत्त्वाची ठरणारी आहे. अशी माहिती पक्षी निरीक्षक विवेक आंबेरकर यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना दिली.
पक्ष्यांचा हरवता अधिवास आणि कृत्रिम घरट्यांची नवी आस
सध्या सगळीकडे पक्षी सप्ताह ( ५ ते १२ नोव्हेंबर ) साजरा होत आहे. त्या निमित्ताने पुन्हा एकदा शहरांच्या वाढत्या मर्यादांमुळे निसर्ग आणि पक्ष्यांच्या जगण्यावर काय परिणाम होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे. झपाट्याने वाढणाऱ्या पुणे शहराने विकासाची नवी शिखरे गाठली असली, तरी या प्रगतीच्या वाटचालीत निसर्गावर, विशेषतः पक्ष्यांच्या अधिवासावर, मोठे अतिक्रमण झाले आहे.
Pune News : पक्ष्यांचा हरवता अधिवास आणि कृत्रिम घरट्यांची नवी आस!
एकेकाळी शहरातील वाडे, अंगणे, आणि डेरेदार झाडे हे अनेक पक्ष्यांचे नैसर्गिक निवासस्थान होते. झाडांच्या फांद्यांमध्ये, खोडांमध्ये आणि पोकळ डोल्यांमध्ये असंख्य घरटी वसलेली असायची. पण आता वाडा संस्कृती संपली आणि उंच इमारतींनी आणि काँक्रीटच्या भिंतींनी ती जागा घेतली. आज झाडांची संख्या झपाट्याने कमी होत असून पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी जागाच उरलेली नाही.






