माथेरान/संतोष पेरणे: शहरात विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विजयादशमी निमित्त हरहर चांगभले धनगर समाजाने मेळाव्याचे आयोजन केले. समाज बांधवांनी धनगरी नृत्य, गजानृत्य करून पर्यटकांचे लक्ष वेधले आणि या नृत्यांमुळे माथेरान शहरात आलेले पर्यटक देखील सहभागी झाले. रायगड जिल्ह्यात माथेरान हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे.
माथेरानमध्ये धनगर समाजाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे विजयादशमी निमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्यासाठी कर्जत तालुक्यातील सर्व भागातून मोठ्या प्रमाणावर धनगर समाज एकवटला.अध्यक्ष राकेश कोकळे,महिला अध्यक्षा संगीता ढेबे यांच्या माध्यमातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.सर्वत्र सदानंदाचा जयघोष दुमदुमला. ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. कर्जत,नेरळ,खालापूर तसेच आजूबाजूच्या सर्व गावांतील धनगर माथेरानमध्ये दाखल झाले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक येथून मिरवणुकीत सर्व सामील झाले. ‘सदानंदाचा येळकोट’, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ या घोषणा देत मिरवणूक वाजतगाजत बाजारपेठेच्या दिशेने निघाली.सर्वत्र भंडारा उधळत नाचत मिरवणूक निघाली.ही माथेरानच्या मध्यवर्ती ठिकाणी आल्यानंतर फेर धरून महिलांनी आनंदोत्सव यामुळे परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.
माथेरानमध्ये दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. या प्रसंगी समाज बांधव कर्जत तसेच खालापूर तालुक्यातून येत असतात. पिसारनाथ मंदिरामध्ये विधिवत पूजाअर्चा होते. तिथे सुद्धा गजानृत्य सादर केले जाते. मिरवणूक काढली जाते.तरुणाईने पारंपरिक धनगरी नृत्य केले तर काही समाज बांधवांनी गजानृत्य करून पर्यटकांचे लक्ष वेधले. आनंदोत्सव साजरा केल्यानंतर मिरवणूक पिसारनाथ मंदिराकडे रवाना झाली.अतिशय शिस्तीने महिला पुरुष बांधव या मेळाव्यातून पिसरनाथ मंदिराकडे निघाले. मंदिरामध्ये आरतीने या मेळाव्याची सांगता करण्यात आली. हा मेळावा यशस्वी धनगर समाज संघटना यांच्याकडून योग्य नियोजन करण्यात आले होते.