
'रणजितदादा बाहेर पडा, भाकरी फिरवा'; मोहिते-पाटील गटाच्या नेते, कार्यकर्त्यांची शिवरत्न बंगल्यावर बैठक
अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर सोलापूर जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी बँकेच्या कारभाराबाबत आपली भूमिका मांडली. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले, “सोलापूर जिल्ह्याची राजकीय घडी पूर्ववत बसवण्यासाठी मी कोणताही अहंकार न बाळगता जिल्ह्यातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या दारात जाणार आहे. मी सर्वांना फोन केले आहेत. जिल्ह्यातील सध्याचे राजकारण पाहता परिवर्तन व्हावे, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. आम्हाला अपेक्षेपेक्षाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.”
सध्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग दिला आहे. विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देतानाच सहकार क्षेत्रातील निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे.
‘रणजितदादा सक्रिय व्हा, जिल्ह्याची मोळी पुन्हा बांधा !’
बैठकीला सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून मोहिते-पाटील गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सक्रिय राजकारणात पुढाकार घ्यावा, जिल्हाभर फिरून नेते व कार्यकर्त्यांची मोट बांधावी आणि जिल्ह्याला गतवैभव मिळवून द्यावे, अशी मागणी उपस्थितांनी केली.
जिल्ह्याबाहेरून आलेल्या नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाची घडी विस्कटली असल्याची भावना यावेळी काही नेत्यांनी व्यक्त केली. पैशांचे वाटप, सत्तेचा धाक, दडपशाही आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे राजकीय वातावरण दूषित झाले आहे. जिल्ह्यात पुन्हा सुसंवाद आणि एकजूट निर्माण करण्यासाठी मोहिते-पाटील यांनी पुढाकार घ्यावा, अशी भूमिका नेते व कार्यकर्त्यांनी मांडली.
‘कुंपणानेच शेत खाल्ले’ – आमदार अभिजित पाटील
आमदार अभिजित पाटील यांनी बँकेच्या कारभारावर भाष्य करताना प्रशासकांच्या भूमिकेवर टीका केली. ते म्हणाले, “बँकेची घडी व्यवस्थित बसावी यासाठी सरकारने बँकेवर प्रशासक नेमला. मात्र, या प्रशासकाने शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष न देता पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून उद्योगांना कर्जे दिली. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्र मोडीत निघून खासगीकरण वाढले आहे. सहकार टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार आहोत.”
‘मी बँकेला यशाच्या शिखरावर नेले’ – रणजितसिंह मोहिते-पाटील
बँकेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील कामगिरीचा आढावा घेताना रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले, “२००५ मध्ये मी बँकेचा चेअरमन झालो, तेव्हा बँकेकडे रिझर्व्ह बँकेचा परवाना नव्हता. तो मिळवण्यासाठी मी प्रयत्न केले. माझ्या चेअरमनपदाच्या आधी बँकेकडे १५०३ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. माझ्या कार्यकाळात त्या वाढून २९६२ कोटी रुपये झाल्या.”
ते पुढे म्हणाले, “मी डीसीसी बँक ग्रामीण भागापर्यंत पोहोचवली. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केले. ट्रॅक्टर खरेदीसाठी तसेच घरांसाठी कर्ज देण्यास सुरुवात केली. पंढरपूर येथे केशरमाती प्रदर्शन भरवले आणि अडीच लाख शेतकऱ्यांचा विमा उतरवला.”
“बँकेची गुंतवणूक माझ्या कार्यकाळापूर्वी ४१२ कोटी रुपये होती. ती वाढवून १,२१० कोटी रुपयांपर्यंत नेली. तसेच, माझ्या चेअरमनपदाच्या आधी शेतकऱ्यांना १,६३३ कोटी रुपयांची कर्जे देण्यात आली होती. माझ्या कार्यकाळात ही रक्कम वाढून २,१५५ कोटी रुपये झाली,” असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या बैठकीला ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, लक्ष्मणराव ढोबळे, धनाजी साठे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, वसंतनाना देशमुख, शिवानंद पाटील, सवितादेवी राजे भोसले, देवानंद बागल, भारत शिंदे, दत्तात्रय मगर, देवानंद गुंड-पाटील, बाळासाहेब पाटील, अनिकेत देशमुख, अनिरुद्ध कांबळे, विश्वास बारबोले, प्रथमेश म्हेत्रे, महेश तळेकर, दशरथ कांबळे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आलेले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
FAQ
शिवरत्न बंगल्यावर बैठक का झाली? काय निर्णय झाला?
– शिवरत्न बंगला, अकलूज हे मोहिते-पाटील कुटुंबाचे निवासस्थान आहे. बैठकीचा उद्देश हा माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये सुरू असलेल्या वादावर तोडगा आणि 2026 च्या निवडणुका हा होता.
बैठकीत कोणते मुद्दे चर्चिले गेले?
– धैर्यशील मोहिते-पाटील यांना NCP (SP) कडून 2024 ला उमेदवारी मिळाली. ते शरद पवार गटात गेले. तर रणजितसिंह भाजपमध्येच राहिले. मात्र, या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
रणजितसिंह मोहिते-पाटील कोण आहेत?
– विजयसिंह मोहिते-पाटील हे त्यांचे वडील आहेत. माजी उपमुख्यमंत्री, माढ्याचे माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत.