मराठवाड्यात पुढील चार दिवस बरसणार
मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. या मान्सूनपूर्व पावसाचा मोठा फटका हा राज्याला बसला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटना देखील घडल्या आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण कोकण, गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रात जे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, ते येत्या 36 तासांमध्ये अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानंतर हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे कूच करणार आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा 35 ते 40 किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो, असा अंदाज आहे.
हेदेखील वाचा : मुसळधार पावसामुळे आंबोली घाटात कोसळली दरड; आंबोली-गोवा मार्गावरील वाहतूक बंद
दरम्यान, पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या जिल्ह्यांना शुक्रवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी या जिल्ह्यांत पावसाचा प्रभाव येत्या सोमवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी राहील. फक्त काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, असेही सांगण्यात येत आहे.
पंढरपूरला पावसाने चांगलेच झोडपले
पंढरपूर शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले असून, गेल्या तीन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस पडत आहे. कासेगांव, तनाळी, सिध्देवाडी, तावशी आणि शहर तालुक्याचा काही भाग येथे मोठ्या प्रमाणावर मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला आहे. शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे ओढ्या-नाल्यांना पूर आला.