मुसळधार पावसामुळे आंबोली घाटात कोसळली दरड; आंबोली-गोवा मार्गावरील वाहतूक बंद
कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे आंबोली-गोवा मार्गावर आंबोली धबधब्याजवळ दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दरड कोसळल्यामुळे या मार्गावर एक रुग्णवाहिका अडकली होती. यावेळी काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत रस्त्यावर पडलेले मोठमोठे दगड बाजूला केले आणि रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी वाट करून दिली.
दरम्यान, या भागात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सततच्या पावसामुळे आंबोली धबधबाही पूर्णपणे प्रवाहित झाला असून, परिसरात जुलै-ऑगस्ट महिन्यातील पावसासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसभर रिपरिप सुरू असल्याने हवेत गारठा जाणवतो आहे. या अवेळी पावसामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची काढणीला आलेली पिकं अजूनही शिवारात उभी आहेत.
तसेच या पिकांची काढणी करता न आल्याने नुकसान होत आहे. ऊस पिकासाठी हा पाऊस फायदेशीर असला तरी, उसाच्या लागवडीचे काम आणि पेरणीपूर्व मशागतीही ठप्प झाल्या आहेत. हवामान विभागाने पुढील तीन-चार दिवस पावसाचा इशारा दिला असून, शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामानात होतोय बदल
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मे महिना आता संपत आला आहे. त्यानुसार, हवामानातही बदल होताना दिसत आहे. नैऋत्य मोसमी वारे वेगाने पुढे सरकत आहेत. हवामान खात्याने पूर्वी वर्तवलेल्या अंदाजापेक्षाही मान्सून यंदा आणखी लवकर भारतात दाखल होणार आहे. पुढील तीन-चार दिवसांत म्हणजेच 23 ते 24 मे दरम्यान केरळच्या किनारपट्टीवर मोसमी पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.