सासवड: छत्रपती शिवाजी महाराज हे महापराक्रमी आणि आदर्श असे राजे होते. महिलांच्याबद्दल त्यांच्या मनात नित्तांत आदर होता आणि पुरोगामी विचार पुढे घेवून जाणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी भोसलेंचे नाही तर रयतेचे राज्य निर्माण केले. हिंदवी स्वराज्याचा त्यांनी पाया घातला आणि राज्य मजबूत केले. त्याचबरोबर पुढच्या पिढीला नवीन विचार दिले, स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. आणि त्यांचा आदर्श घेवूनच भविष्यात अटकेपार झेंडा फडकला, अशा शब्दात राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करतानाच त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी असे आवाहन केले आहे.
राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी किल्ले पुरंदर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन डॉ. दिगंबर दुर्गाडे, तहसीलदार विक्रम राजपूत, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी , माजी आमदार संभाजी कुंजीर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ, कात्रज दुध संघाचे उपाध्यक्ष तानाजी जगताप, शरद जगताप, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा नीता सुभागडे, अमित झेंडे, कांचन निगडे, विराज काकडे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पुरंदर तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले पुरंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी उत्साह संचारलेला पाहायला मिळाला. मंगळवारी रात्री पासूनच शिवभक्त मोठ्या संख्येने शिवज्योत घेवून मोठ्या किल्ले पुरंदर येथे दाखल होत होते. यावेळी ” जय शिवाजी, जय भवानी आणि हर हर महादेव या घोषणांनी संपूर्ण किल्ल्याचा परिसर दणाणून गेला होता.
पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी सासवड येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच माजी आमदार संजय जगताप यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आपले स्वराज्य हे रयतेचे राज्य व्हावे या एकाच ध्येयाने छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रचंड जिद्द, चिकाटी आणि मेहनत घेवून स्वराज्य स्थापन केले. राज्यातील गड, किल्ले मजबूत केले आणि या राज्याचे शत्रूंपासून रक्षण केले. त्यांची प्रचंड विचारशक्ती, बुद्धिमता आणि दूरदृष्टी यातून भविष्याचा वेध घेवून वाटचाल केली. त्यांनी मिळविलेल्या स्वराज्यामुळेच आपण सार्वजन सुरक्षित आहोत. हि भावना प्रत्येकाने मनात ठेवावी. आणि त्याप्रमाणे वाटचाल करावी असे आवाहन आमदार विजय शिवतारे यांनी केले आहे.
आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि भाग्याचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची सर्व सामान्य लोकांबद्दल असलेली आस्था त्यांनी घालून दिलेले आदर्श आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. तेच विचार त्यांनी घालून दिलेले आदर्श आणि त्यांचा वारसा आपण सर्वांनी पुढे न्यायचा आहे.
– संजय जगताप, माजी आमदार, पुरंदर.