'बाळासाहेब ठाकरे हे दिलदार व्यक्तिमत्त्व होतं, पण...'; गणेश नाईक यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तसे दिलदार व्यक्तिमत्त्व पण ते हलक्या कानाचे होते. याचा अनुभव मी घेतला आहे. मनात एक, पोटात एक, डोक्यात एक असे त्यांच्या बाबतीत कधी घडलं नाही. ते स्पष्टवक्ता होते, पण कोणी एखाद्याने त्यांचे कान भरले आणि ते त्यांना क्लिक झाले की ती गोष्ट ते मनात घर करून बसायची. पण कालांतराने त्यांना त्यांची चूक कळली तर ती चूक कबूल करण्यात त्यांनी कधी संकोच बाळगला नाही, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटले आहे.
वनमंत्री नाईक यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मनात एक, पोटात एक, डोक्यात एक असे त्यांच्या बाबतीत कधी घडलं नाही. ते स्पष्टवक्ता होते. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता, असे बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी वाशी येथील एका कार्यक्रमात म्हटले. यावेळी वनमंत्री नाईक म्हणाले की, ‘1997 मध्ये राज्यात पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेवर आले होते. उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समूहात माझी कामगार संघटना कार्यरत होती’.
तसेच बाळासाहेब ठाकरे, धीरूभाई अंबानी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन हे चांगले मित्र होते. ते आठ-पंधरा दिवसांनी धीरूभाई अंबानी यांच्या मुंबईतील घरात चर्चा करण्यासाठी भेटत होते. तेव्हा कधीतरी गप्पांच्या ओघात धीरूभाई अंबानी यांनी ‘बाळासाहेबांना मला मुख्यमंत्री करा’ असे सुचवले. पण, बाळासाहेबांना हा प्रस्ताव आवडला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
राजकारणात ‘टांग’ मारणे मला कधीही आवडले नाही
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर बाळासाहेबांनी माझ्यावर गटनेतेपदाची जबाबदारी जबरदस्तीने टाकली. पक्षात इतर ज्येष्ठ नेते, नेते असताना त्यांना डावलून मला गटनेते पद देणे मला आवडेले नाही. राजकारणात आलेली संधी सोडू नये, असे म्हणतात. राजकारणात इतरांना टांग मारूनच पुढे जायचे असते, असे सांगितले जाते. पण माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत तेथे अशाप्रकारे टांग मारणं, मला कधी आवडलं नाही, असा टोला नाईक यांनी लगावला.