सातारा गॅझेटबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचं मोठं विधान, म्हणाले; येत्या महिनाभरात...
सातारा : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणाऱ्या हैदराबाद गॅझेटच्या धर्तीवर सातारा गॅझेट लागू करण्याची प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केली आहे. यासंदर्भातील जीआर परिपूर्ण आणि कायद्याच्या चौकटीत टिकणारा असेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. साताऱ्यात मराठा समन्वयक समितीच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, सातारा गॅझेट चिकित्सक मुद्द्यांनी समृद्ध करून पुढील एक महिन्यात लागू करण्यात येईल. या संदर्भातील राज्य शासनाची तयारी सुरू झाली असून, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वेळोवेळी ठाम भूमिका घेतली. २०१९ मध्ये त्यांनी दिलेले आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत टिकले होते; मात्र महाविकास आघाडीच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले. आता हैदराबाद गॅझेटनंतर सातारा गॅझेटच्या आधारे आरक्षणाचा जीआर लागू होणार आहे.
सर्वसमावेशक आरक्षणाची अंमलबजावणी
यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत विचारले की, “मराठा समाजासाठी तुमच्या पक्षाने काय केले, हे कधी तपासले का?” तसेच, ओबीसी समाजाचा या निर्णयामुळे कोणताही तोटा होणार नाही, जातीय सलोखा कायम ठेवत सर्वसमावेशक आरक्षणाची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाच्या मागण्या वीस-पंचवीस वर्षांपासून प्रलंबित असून, अनेक मुख्यमंत्री झाले तरी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच, मराठा आरक्षण आंदोलनात नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेलाही राज्य शासन गांभीर्याने हाताळत असल्याची माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणविसांचे योगदान अतुलनीय
दरम्यान, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जंगी सत्कार करण्यात येईल, अशी घोषणा शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. “मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाला दोनदा आरक्षण दिले आहे. त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच, मनोज जरांगे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी म्हटले की, “तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देवो; या जीआरसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. यावेळी सोहळ्यात भाजप जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शरद काटकर, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे आदी मान्यवर उपस्थित होते.