
..म्हणून गुप्तता पाळण्यात आली' ; स्वारगेट बलात्कार प्रकरणावर गृहराज्यमंत्र्यांचं मोठं विधान
पुण्यातील स्वारगेट एसटी बस डेपोतील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला आहे. या प्रकारानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत असून पोलिसांनीही आरोपीच्या शोधासाठी पथके तैनात केली आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार होता, त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या संदर्भात गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आत आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर त्याला ट्रॅक करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी त्याच्या तापासासाठी पथके तयार केली आहेत. त्याचं संभाव्य लोकेशनही मिळालं आहे. मात्र तपास सुरु असल्याने मी ते देणार नाही. आरोपीला लवकरच अटक केली जाईल. एक गैरसमज तयार केला जातो आहे की घटना मंगळवारी घडली आणि बुधवारपर्यंत माहिती समोर आणली गेली नाही. मात्र ही फिर्याद आल्यानंतर तातडीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली होती.
पोलिसांनी गुप्तता बाळगली होती कारण आरोपीला या गोष्टीचा तपास लागता कामा नये. आरोपी पळून जाऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली. ती पाळणं आवश्यक आहे. आरोपी लवकरच पकडला जाईल. पुणे शहरात जी घटना घडली आहे ती बस डेपोच्या आवारात घडली आहे. पोलिसांनी रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत गस्त कितीवेळा घातली गेली याचीही माहिती मी घेतली आहे. PIही रात्री दीड वाजता गेले होते, त्यानंतर टीमसह तीन वाजताही तिथे होते. पोलीस अलर्ट नव्हते असा विषय नव्हता. आरोपीवर भुरट्या चोरीचे गुन्हे दाखल आहे. मात्र ते ग्रामीण भागातल्या पोलीस ठाण्यात आहे. पुणे शहरात जे आरोपी आहेत त्यांच्याकडे पोलीस लक्ष ठेवून असतात. त्यांचं रेकॉर्ड पोलिसांकडे असतं. जे ग्रामीण भागातून येतात त्यांचा रेकॉर्ड नसतो, असंही कदम म्हणाले आहेत.
दरम्यान, पुण्यात जी घटना घडली ती फोर्सफुली घडली किंवा स्ट्रगल झाला असं काही कळलं नाही. कारण १० ते १५ लोक त्या परिसरात होते. त्यामुळे गु्न्हा आरोपीला करता आला. असंही योगेश कदम यांनी म्हटलं आहे. पोलिसांकडून कुठलीही दिरंगाई झालेली नाही. घटना घडली तेव्हा कुठलाही अलर्ट मिळाला नाही. जी खासगी सुरक्षा ठेवली जाते त्यांनी नक्कीच चुका केल्या आहेत. कारण खासगी सुरक्षा रक्षक गुन्हा घडला तेव्हा तिथे नव्हते असंही योगेश कदम यांनी स्पष्ट केलं.