
डेटिंग ॲपवरून ओळख, तरुणाला भेटायला बोलावले अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुणे : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. डेटिंग ॲपवरून ओळख केल्यानंतर भेटण्यास बोलवत तरूणाला शस्त्राच्या धाकाने लुटल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. या प्रकरणात कोंढवा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या चौघांकडून लुटमारीचे आणखी दोन प्रकार उघडकीस आले असून, सर्व आरोपी कात्रज भागातील आहेत.
राहील अकिल शेख (वय १९, रा. सोमजी डी मार्ट पाठीमागे, कोंढवा), शाहिद शानुर मोमीन (वय २५, रा. संतोषनगर, कात्रज), रोहन नईम शेख (वय १९, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा), ईशान निसार शेख (वय २५, रा. अंजनीनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत एका २४ वर्षीय तरुणाने तक्रार दाखल केली होती.
तक्रारदार समलैंगिक ॲप पाहत असताना एका आयडीवरून त्याला मेसेज आला. ओळखीनंतर आरोपींनी त्याला कोंढव्यात भेटण्यास बोलावले. त्याला निर्जन रस्त्यावर नेत धारदार हत्याराचा धाक दाखवून त्याच्याजवळील मोबाईल व सोन्या-चांदीचे दागिनेही हिसकाऊन घेतले. त्याला मारहाण करून सोडून दिले होते. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच कोंढवा पोलिसांनी तांत्रिक तपासावरून आरोपींचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या.
हे सुद्धा वाचा : राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
आणखी दोघांना लुटले
गेल्या वर्षात (दि. ३१ डिसेंबर) सायंकाळी दुचाकीवरुन निघालेला ३२ वर्षीय तरुण कौसरबाग येथे लघुशंकेसाठी थांबला होता. त्यावेळी या चौघांनी त्याला मारहाण करून व धमकावत मोबाईल हिसकावून घेत त्याच्याकडे १० हजार रुपयांची मागणी केली होती. त्याच्याकडे १ हजार रुपये होते. त्यालाही मित्राकडून पैसे घेण्यास सांगितले. त्याने १० हजार रुपये एका मित्राकडून घेतले. तेव्हा आरोपींनी ते पैसे व मोबाईल नेल्याचे समोर आले आहे. नंतर त्यांनी डेटिंग अॅप पाहणार्या वाघोलीतील २७ वर्षाच्या तरुणाला देखील शितल पेट्रोलपंपाजवळ बोलावून घेत मोकळ्या मैदानात नेत शस्त्राच्या धाकाने लुटल्याचे समोर आले आहे.
लग्नाचे आमिष दाखवून ९२ हजारांची फसवणूक
फेसबुकवर ओळख करून प्रेमसंबंध निर्माण केले आणि बहिणीच्या लग्नाचे कारण सांगून एका तरुणाने तरुणीची आर्थिक फसवणूक केली. ही घटना १३ डिसेंबर २०२५ रोजी आंबेठाण येथील दवणे वस्ती परिसरात घडली आहे. रेन संजय कुशवाह (२५, पवार बिल्डिंग, आंबेठाण) या तरुणीने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बबलू रवींद्र कुशवाह (रामबाग, कुशीनगर, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.