
दोस्तीत कुस्ती! मित्राने केला साथीदारांच्या मदतीने मित्राचा खून; कारण काय तर...
वारजे येथील वन विभागाच्या टेकडीवरील निर्जन जागेत एकाचा मृतदेह वारजे पोलिसांना शुक्रवारी मिळाला होता. कोणीतरी त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी मारून तसेच दगडाने चेहरा ठेचून त्याचा खून केला होता. त्याची ओळख पटली नव्हती. मृतदेहाची अवस्था पाहून वारजे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता. सहायक फौजदार बाळू गायकवाड व पोलिस अंमलदार साई कारके यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गणपती माथा ते शिंदे पूल वारजे दरम्यान दोन संशयित थांबले असून, त्यांनी काहीतरी गुन्हा केल्याचे त्यांच्या हालचाली व बोलण्यावरुन वाटत आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक दत्ताराम बागवे, सहायक पोलिस निरीक्षक वर्षा कावडे व अंमलदार तेथे गेले. पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. दोघांना ताब्यात घेतले आणि चौकशीत त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्य दोघांना ताब्यात घेतले.
राजेंद्र ऐलगच्चे यांनी एकाला १८ लाख रुपये दिले होते. ती वसुली करुन देतो, असे सांगून शुभम शिंदे याने ११ लाख रुपये घेतले होते. हे पैसे राजेंद्र ऐलगच्चे परत मागत होता. राजेंद्र ऐलगच्चे याला संपवले तर पैसे द्यावे लागणार नाहीत, असे समजून त्याने साथीदारांना मदतीला घेत ऐलगच्चे यांना वारजे येथील शनी मंदिर टेकडी येथे बोलवले. ते तेथे आले असता शुभम व त्याच्या साथीदारांनी लोखंडी हत्याराने गळ्यावर, छातीवर, पोटावर, पायावर वार केले. डोक्यात दगड घालून त्यांचा चेहरा विद्रूप करुन टाकला. आरोपींना पुढील कारवाईसाठी वारजे माळवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.