
पत्नीचे अनैतिक संबंध? संशय येताच नवऱ्याने चाकू घेतला अन्...; पुण्यात घडली हृदयद्रावक घटना
चाकूने वार करुन महिलेचा खून
लोणीकंद पोलिसांनी तरुणाला केली अटक
अनैतिक संबंधांतून घडली घटना
पुणे/Crrime News: मित्राबरोबर अनैतिक संबंध असल्याने महिलेवर चाकूने वार करुन खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली.नम्रता शैलेंद्र व्हटकर ऊर्फ नम्रता चंद्रशेखर इंगळे (वय १९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी शैलेंद्र प्रकाश व्हटकर (वय ३०, रा. बकोरी, ता. हवेली) याला अटक केली. याबाबत शाहरुख दस्तगीर पठाण (वय २३, रा. बालाजी सोसायटी, शिरसवडी,वाडेबोल्हाई) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाहरुख पठाण आणि नम्रता व्हटकर दोन महिन्यांपासून एकत्र राहण्यास आहेत. नम्रता आणि पठाण हे नगर रस्त्यावरील एका खासगी कंपनीत कामाला होते. तेथे दोघांची ओळख झाली. दोन वर्षांपूर्वी नम्रताचा शैलेंद्र व्हटकर याच्याशी विवाह झाला होता. नम्रता आणि पठाण यांच्यात अनेैतिक संबंध असल्याची कुणकुण शैलेंद्रला लागली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. दोन महिन्यांपूर्वी नम्रता शैलेंद्रशी भांडण करून पठाण याच्याकडे राहण्यास आली होती.
विवाहात दिलेले नम्रताचे सोन्याचे दागिने शैलेंद्रकडे होते. तिने त्याच्याकडे दागिने परत करण्याची मागणी केली होती. दरम्यान, नम्रता आणि पठाण यांना शैलेंद्रने नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई मंदिराजवळ बोलावले. पठाणचा मित्र हरीश कोळपे तेथे आला होता. शैलेंद्रने नम्रताच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तिला जोगेश्वरी हायस्कूलजवळ बोलाविले. तेथे दोघांमध्ये वाद झाले. वादातून शैलेंद्रने नम्रतावर चाकूने वार केले. नम्रताचा ओरडण्याचा आवाज पठाणने ऐकला.
पुढील तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेरावर कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या शैलेंद्र याला अटक करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक खेडकर करत आहेत.