कारंजा : बालकांचा मोफत (Children’s free) आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम अंतर्गत (Under the Right to Compulsory Education Act ) शाळाबाह्य व स्थलांतरित मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्याकरिता तालुकास्तर समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या वतीने मिशन झिरो ड्रॉप आऊट (Mission Zero Drop Out) या सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात आला.
तहसीलदार धीरज मांजरे (Tehsildar Dheeraj Manjre ) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येऊन ‘मिशन झिरो ड्रॉप आउट मोहीम’ राबविण्यात येणार आहे. मोहिमेअंतर्गत कुटुंबातील ३ ते १८ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण ५ ते २० जुलै या कालावधीत शाळाबाह्य व स्थलांतरीत मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व खेडी, गाव, वाडी, तांडे, पांडे व शेतमळ्यात जंगलात वास्तव करणाऱ्या बालकांचा सर्वेक्षणात समावेश करावा. या मुलांना जवळच्या शाळा व अंगणवाडीत दाखल करण्यात यावे. प्राथमिक शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान या अनुषंगाने झालेल्या बैठकीला गटविकास अधिकारी शृंगारे, डायट अधिव्याख्याता करडे, ज्येष्ठ विस्तार शिक्षण अधिकारी खंडारे, तालुका आरोग्य अधिकारी किरण जाधव, एकात्मिक बाल विकास अधिकारी जाधव, सर्वधर्म मित्र मंडलाचे अध्यक्ष श्याम सवाई, तालुका बालरक्षक नितीन केळतकर, तालुका बालरक्षक रजनी चारथड, सर्व केंद्र प्रमुख गट शिक्षणाधिकारी तथा सदस्य सचिव श्रीकांत माने यांनी मोलाचे मार्गदर्शन करून आवाहन केले. या मोहिमेची सुरुवात मानोरा रोडवरील स्थलांतरित होऊन आलेल्या पालकांशी व मुलांशी संवाद साधण्यात येऊन याकरिता तालुका समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते. शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आल्यास वरील यंत्रणेशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.