मुंबई– पिंपरी चिंचवड़चे ज्येष्ठ नेते आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दिर्घ आजारामुळे आज मंगळवारी सकाळी रुग्णालयात निधन झाले आहे. चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप हे अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. अशातच पुन्हा त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. आपल्या मतदारसंघातील लोकप्रिय आमदार म्हणून जगताप यांची ओळख होती. जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड शहरात शोककळा पसरली आहे. तसेच राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत असून, अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शोक व्यक करत, लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
[read_also content=”निवासी डॉक्टर संप दिवस दुसरा! संपामुळं आरोग्यसेवा कोलमडली रुग्णांचे हाल; आज संपात ‘एवढे डॉक्टर’ झालेत सहभागी, आकडा माहित आहे का? https://www.navarashtra.com/maharashtra/resident-doctor-strike-day-two-health-services-collapsed-due-to-strike-plight-of-patients-today-so-many-doctors-have-participated-in-the-strike-358874.html”]
तडफदार नेतृत्व काळाने हिरावले – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
“नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच दिवंगत जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आमदार जगताप यांनी स्वकर्तृत्वाने कारकीर्द घडवली. पिंपरी -चिंचवडचा विकास हा त्यांचा ध्यास होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. विधिमंडळातही ते आपला मतदारसंघ आणि परिसरातील समस्या, अडचणी यासाठी हिरीरीने काम करत असत. लोकहिताच्या दृष्टीने अनेकदा त्यांनी संघर्षशील भूमिका घेतली. आजारपणाशीही त्यांचा प्रदीर्घ लढा सुरू होता. यातही त्यांनी आपले कर्तव्य बजावताना कुचराई केली नाही. पण नियतीला हे मान्य नसावे आणि आमदार जगताप यांना काळाने हिरावून नेले. हा त्यांच्या परिवारासह, कार्यकर्ते, चाहत्यांसाठी मोठा आघात आहे. जगताप कुटुंबियांना या आघातातून सावरण्यासाठी बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
राजकारण- समाजकारणात ठाम भूमिका मांडणारा नेता गमावला – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक समाजाभिमुख, नागरी प्रश्नाची जाण आणि त्याची उकल माहिती असलेला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने केवळ भारतीय जनता पक्षाचेच नाही तर माझेही वैयक्तिक नुकसान झाले आहे. मी एक चांगला मित्र गमावला आहे. राजकारण आणि समाजकारणात ठाम भूमिका घेणारा नेता आपल्यातून निघून गेला, अशा शब्दांत उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात दिलेले योगदान कायम लक्षात राहील. मतदारसंघाचा विकास हाच ध्यास घेऊन त्यांनी काम केले. वाढत्या शहरीकरणात वंचित व उपेक्षित घटकांच्या हिताला बाधा न पोहचता विकास झाला पाहिजे यासाठी ते आग्रही होते. आपल्या आजारपणातही त्यांनी राज्यसभेसाठी मतदान करून राज्याचा आवाज संसदेत वाढला पाहिजे, यासाठी आग्रह धरला. मी त्यांना मतदानात भाग घेऊ नका, आपली तब्येत सांभाळा असे सांगूनही त्यांनी आपली कर्तव्यनिष्ठा दाखवली होती. विधानभवनात पीपीई कीट घालून त्यांचे मतदानाला येणे आणि त्यावेळी अत्यंत प्रेमाने मला दिलेली हाक मी कधीच विसरू शकणार नाही. या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत.
झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला- अजित पवार
लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला असल्याची भावना व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम केले. राजकीय, सामाजिक जीवनात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधीमंडळात मांडणारा धडाडीचा लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. अशा शद्बात अजित पवार यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
जगताप यांच्या निधनाने कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड- छगन भुजबळ
आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविणारा कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला अशा शब्दात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. लक्ष्मण जगताप यांनी नगरसेवक पद, महापौर पद भूषविले. त्यांनी स्थानिक स्वराज्यसंस्थातून विधानपरिषदेत त्यानंतर विधानसभेतही त्यांनी आमदार म्हणून काम केल. त्यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड मतदारसंघातील नागरिक एका कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीला कायमचे मुकले आहे. मी व माझे कुटुंबीय जगताप कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.