File Photo : Kolhapur_MNS
कोल्हापूर : ऐतिहासिक कोल्हापूरमध्ये बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरमध्ये होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर शहर व जिल्हातर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकामध्ये खंडपीठ होण्यासंदर्भात घोषणा देऊन निदर्शने करत आंदोलन करण्यात आले.
हेदेखील वाचा : विक्रम गायकवाड हत्येप्रकरणी एसआयटीची स्थापना; पोलीस अधीक्षकांची माहिती; रामदास आठवले घेणार पीडित कुटुंबियांची भेट
खंडपीठाच्या मागणीसाठी दसरा चौकामध्ये आमरण उपोषणास बसलेले पदवीधर मित्र माणिक पाटील चुयेकर यांना यावेळी मनसे कोल्हापूरतर्फे पाठिंबा दर्शवण्यात आला. याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी वकील संघटना, कृती समितीसह, कोल्हापूर शहरातील सर्व तालीम, संस्था, संघटना व मंडळे यांना एकत्रित घेऊन आयआरबीसारखे मोठे आंदोलन उभा करून कोणतेही परिस्थितीमध्ये खंडपीठाचे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला.
शहराध्यक्ष प्रसाद पाटील तीव्र शब्दांत व्यक्त होताना म्हणाले की, ‘सत्ताधारी आणि विरोधक यांनी संगनमताने जाणीवपूर्वक खंडपीठाचा खेळ चालवलेला आहे. आजचे विरोधक-पूर्वीचे सत्ताधारी होते. पूर्वीचे सत्ताधारी-आजचे विरोधक आहेत. विरोधात असताना केवळ घोषणाबाजी करायची. मात्र, सत्तेत बसल्यानंतर या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करून कोल्हापूरच्या जनतेवर महाराष्ट्र शासन जाणीवपूर्वक अन्याय अत्याचार करत आहे. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या खंडपीठासाठी ३०० कोटी रुपये जाहीर केले होते, ते कुठे गेले असा प्रश्न उपस्थित केला.
पालकमंत्र्यांनी देखील या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित प्रश्न न सोडवल्यास याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे कोल्हापूरतर्फे देण्यात आला. जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांचे नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील, निलेश धुम्मा, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
हेदेखील वाचा : SSC Board Exam राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची उद्यापासून बोर्डाची परीक्षा; परीक्षेचा पॅटर्न सोपा, उत्तीर्णांची संख्या वाढणार?