डायघर डंपिंगला लागलेल्या आगीवरुन मनसे नेते राजू पाटील यांची शिंदे पिता पुत्रावर जळजळीत टिका
डंपिंग ग्राऊंडची व्यवस्था ही परिसरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी असते. परंतु, जर याच डंपिंग ग्राऊंडला आग लागली, तर संपूर्ण परिसर दूषित आणि धोकादायक बनतो. त्यातून आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. अशाच प्रकाराची घटना ठाण्यातील डायघर डंपिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीच्या रूपात समोर आली आहे. या आगीमुळे परिसरातील हवा दूषित झाली असून, स्थानिक नागरिकांना अनेक आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
डायघर डंपिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीवर मनसे माजी आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आगपाखड करणारी टिका केली आहे. राजू पाटीलयांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. माजी आमदार पाटील यांनी टीकेचे ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ठाण्यात साहेबांच्या कुटुंबाला थोडी अडचण झाली तर त्या दुकानदाराचे अतिक्रमण लगेच तोडले. मग आत्ता डायघरला परिसरातील नागरीकांचे दु:ख ह्यांना दिसत नाही का ?
ठाण्याच्या कचऱ्यापासून डायघमध्ये वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प सुुरु केला होता. हा प्रकल्प सुरु होण्याआधीच अधिकाऱ्यांना सांगितलं होते की, तुमचा हा प्रकल्प यशस्वी होणार नाही. प्रकल्प सुरु करण्यासाठी आवश्यक ते नियम पाळले जात नव्हते. शेवटी कचऱ्यापासून वीज निर्मिती नव्हे तर ह्यांनी दुर्गंधीची निर्मीती केली. आता तर भयंकर वायूप्रदूषण पण होत आहे. या संदर्भात सातत्याने ग्रामस्थांसोबत संघर्ष केला आहे. ठाण्याचा कचरा डायघरमध्ये बंद केला. पण आत्ता आपलीच मक्तेदारी समजून यांनी नागरीकांना गृहीत धरायला घेतले आहे. काल लागलेली आग अजूनही धुमसते आहे. नागरीकांच्या घरांमध्ये धूर गेला आहे. मुख्यमंत्री पद भूषविल्यानंतरही हा ठाण्याच्या कचऱ्याचा प्रश्न हे बापबेटे सोडवू शकले नाहीत. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. अर्थात कचऱ्यात पण भ्रष्टाचार करुन पैसा खाणाऱ्यांना थोडी तरी लाच शरम उरली असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठाणे महापालिकेवर गुन्हा दाखल करावा अन्यथा त्यांना नागरीकांच्या रोषाला जामाेरे जावे लागेल.