नांदेड जिल्ह्यात लक्ष्मण हाकेंची कार फोडली
नांदेडमध्ये ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला करण्यात आला आहे. नांदेडच्या कंधार तालुक्यातील बाचोटीमध्ये लक्ष्मण यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर ओबीसी समाज आणि इरत समाजाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याची माहिती आहे. घटनेनंतर काहीकाळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. लोहा कंधार मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर पाटील यांच्या प्रचारार्थ लक्ष्मण हाके यांची सभा होती. या सभेदरम्यान दोन गट आमनेसामने आल्यानंतर गोंधळा झाला. यावेळी एका गटाने लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला केला.
हेही वाचा-Raj Thackeray : ‘…तर मशिदींवरील भोंगे बंद करू’ ; घाटकोपरमधील सभेतून राज ठाकरे कडाडले
याबाबत बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले आम्ही लोहा कंधार मतदारसंघात प्रचारासाठी आलो होतो. बाचोटीतून आमच्या वाहनांचा ताफा जात होता. त्यावेळी तोंडाला पांढरा गमछा असलेल्या १०० ते १५० तरुणांच्या जमावाने लाठ्याकाठ्या घेऊन कारवर हल्ला केला. त्यांनी भ्याड हल्ला केला. माझ्यासोबत लोहा कंधारचे उमेदवार आहेत. आम्ही प्रचारासाठी जवळच्या गावात सभा घेणार होतो. या तरुणांनी कारच्या बोनेटवर चढून घोषणाबाजी केली. जरांगे पाटील यांच्या नावाच्या घोषणा दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या हल्ल्यात माझ्या कारच्या काचा फूटल्या आहेत. त्यांनी तोंड बांधून आमच्यावर हल्ला केला. खरंतर त्यांनी समोर येऊन हल्ला करायला पाहिजे होता. आम्ही या महाराष्ट्राचे नागरिक आहोत ना? आम्ही ओबीसी समाजाची बाजू मांडायची नाही का? ओबीसी समाजाची माणसे निवडणुकीला उभी राहिलेली त्यांना आवडत नाहीत. आमच्यावर हल्ला करणाऱ्या या भ्याड लोकांना अटक केली नाही, तर उद्या सकाळी पोलील स्टेशनवर मोर्चा काढण्याचा इशारा, त्यांनी दिला आहे.
हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे. मात्र या घटनेनंतर गुन्हा दाखल झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान या प्रकारानंतर परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
लोहा मतदारसंघातील जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन पाटील यांच्य प्रचारासाठी लक्ष्मण हाके आले होते. दरम्यान प्रचारसभा संपवून परत जाताना बाचोटी येथे हा प्रकार घडला. जवळपास शंभर ते दीडशे तरुणांचा जमाव होता. कार अडवल्यानंतर पहिल्यांदा कारच्या बोनेटवर चढले आणि त्यानंतर गाडीच्या मागच्या बाजूच्या काचा फोडण्यात आल्या. हल्ला करणाऱ्यांच्या हातामध्ये काळे झेंडे होते. हल्लेखोर एक मराठा लाख मराठा आणि मनोज जरांगेंच्या नावाच्या घोषणा दिल्या, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. कार अडवून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी आंदोलक देखील आक्रमक झाले होते. त्यांनी देखील घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. ओबीसी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या करून घोषणा दिल्या. नंतर पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवल्याची माहिती आहे.