वास्तूशांतीचा कार्यक्रम आटोपरून परतणाऱ्या कुटुंबाबर काळाचा घाला; भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू
लातूर जिल्ह्यातील उदगीर अहमदपूर महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. एकुरका गावानजीक ही दुर्घटना घडली असून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना तात्काळ उदगीरच्या सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यांवर उपचार सुरू असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, या कुटु्ंबातील सर्वजण एकत्र लातूरमध्ये वास्तूशांतीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून सर्वजण पुन्हा कारने घरी निघाले होते. दरम्यान लातूरच्या उदगीर-अहमदपूर महामार्गावर एकुरका गावानजीक आल्यानंतर कार आणि ट्रकची जोराची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघं गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर उदगीरच्या सार्वजनिक रुग्णालयात उपचार सुरू आहे
दरम्यान अपघात कसा झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मंगलाबाई जाधव, प्रणीता बिरादार, प्रतिभा भंडे, अनन्या भंडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर संजय भंडे, सई आणि आदिती हे तिघे गंभीर आहेत. या जखमींना उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. दरम्यान एकाच कुटुंबातील चार जणांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.