येत्या 27 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्र या! राज ठाकरेंनी दिले आदेश, काय घोषणा करणार?
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जोरात प्रचार सुरू केला आहे. मशिदींवरील भोंग्यावरून त्यांनी अनेकवेळा भूमिका मांडली आहे. दरम्यान आजही ते मशिदीच्या भोंग्यावरून आक्रमक झालेले पहायला मिळाले. राज्यात सत्ता आली तर मशिदींवरू भोंगे बंद करू, असं म्हणत राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेची आज मुंबईतील घाटकोपरमध्ये प्रचार सभा पार पडली, यावेळी ते बोलत होते.
राजकारण भलतीकडेच सुरू…राज ठाकरेंचा टोला
मुंबई फक्त महाराष्ट्राची राजधानी नाहीतर देशाचं नाक आहे. इंग्रज मुंबईत आले तेव्हा त्यांनी मुंबई कशी वसली होती? मात्र शहराचा अख्खा विचका झाला आहे. मला इथं यायला दीड तास लागला आहे. शहरात किती माणसे येत आहे. रस्ते कमी पडत आहेत. शहराचा विकास करताना काय हवं काय नको याची जबाबदारी जशी नगरसेवकाची तशी ती आमदाराचीही. पण या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी याचं राजकारण कामी लावत नाहीत तर याचं राजकारण भलतीकडेच सुरू असतं, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.
‘पत्रकार मला कुत्सितपणे सारखं ब्लू प्रिंटचं काय झालं ते विचारायचे, पण ब्लू प्रिंट आणली. तेव्हा कोणी विचारायला आलं नाही. कारण कोणी वाचलीच नाही. आंदोलनामुळं टोलनाके बंद झाले. ते पैशांचं मशीन होतं. मात्र ते बंद झाल्यानंतर आम्हाला श्रेय दिलं जात नाही. दुकाने आणि आस्थापनांवरील मराठी पाट्यांचं आंदोलन तसंच होतं. दुकानावरच्या पाट्या मराठी झाल्या. मोबाईल फोनवर मराठी भाषा यायला लागली.’
भोंगे बंद करण्यासाठी साथ हवी होती
त्यानंतर पुढे भोंगे बंद करण्यासाठी आंदोलन केलं. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. महाविकास आघाडीचं हे त्रांगडं सरकार होतं. तीन प्राण्यांचं लग्न झालं होतं. तेव्हा १७ हजार मनसैनिकांवर केस टाकण्यात आल्या. भोंगे बंद करण्यासाठी सरकारनं साथ दिली असती, तर भोंगे बंद झाले असते. ते फक्त प्रचारासाठी हिंदुत्व बोलतात. आता दोन चार दिवसात पक्षाचा जाहीरनामा येईल. राज्यात जर सत्ता आली तर मशीदींचे भोंगे बंद केले जातील. रस्ता अडवून नमाज पढणे बंद करुन टाकू. कुणाचाही धर्म असो तो धर्म चार भिंतीच्या आड असला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोर हिंदूह्रदयसम्राट लावलं जात होतं. मात्र आज ते हटवून जनाब असं लिहिलं जातं. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना काय वाटलं असतं. आज उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सत्तेसाठी गहाण ठेवल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे.