मुंबई, ठाण्यात मुसळधार
Monsoon News Alert: पुणे आणि इतर अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील तीन दिवसही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. पुणे जिल्ह्यात काही भागांमध्ये ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या हवामानाच्या स्थितीमुळे २७, २८ व २९ मे रोजी होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला धोका निर्माण झाल्यामुळे, विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. याशिवाय, मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईत वाहतूक ठप्प झाली आहे. हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून, सोमवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. परिणामी, डबेवाल्यांची सेवा विस्कळीत झाली आहे आणि रेल्वेसेवेवरही परिणाम जाणवत आहे.
पुणे जिल्हा: शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे काही भागांतील बोअरवेलमधून पाणी बाहेर पडू लागले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बोरवेलमध्ये पाण्याचा झरा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. सामान्यतः सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत निर्माण होणारी अशी स्थिती यंदा मे महिन्यातच दिसून येत आहे. पुणे शहरात सकाळपासून पावसात काहीशी उघडझाप दिसून आली आहे. तरीदेखील नागरिकांनी काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.
सातारा : रविवारी फलटण येथे १६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे बाणगंगा नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. परिणामी, शुक्रवार पेठ आणि शनिनगर परिसरातील शंभराहून अधिक घरांमध्ये पाणी शिरले. या पाण्यामुळे नागरिकांच्या घरातील उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. नदीचे पाणी थेट वस्तीत घुसल्यामुळे घरांमध्ये चिखल साचला आहे. सध्या नगरपालिका प्रशासनाने अग्निशामक दलाच्या सहाय्याने पाण्याचा मारा करून परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरू केले आहे.
शिवसेना उबाठा नेत्यांना लग्नाचे निमंत्रण नसते त्यामुळेच अजितदादांवर टीका, विखेंचा टोला
सांगली: सांगली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. सांगली शहरातील आयर्विन पूलाजवळील पाण्याची पातळी आता १६ फूटांवर पोहोचली असून, सकाळपासून ती दर तासाला एक फूटाने वाढत आहे. परिणामी, कृष्णा आणि वारणा नद्या भरभरून वाहू लागल्या आहेत.