चर्चगेट आणि मरीन लाईन्सदरम्यान शॉर्टसर्किट (फोटो सौजन्य-X)
Mumbai Local Update in Marathi: मुंबईत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये आज सकाळपासून तुफान पाऊस पडत असून अनेक रस्ते, रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले आहेत. मुंबई मागील १०० वर्षांतील मे महिन्यांतील रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्याचे सांगितले जात आहे. कोकणातही मुसळधार सुरू असून रायगड आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर दूसरीकडे या मुसळधार पावसाचा परिणाम लोकल वाहतुकीवर दिसून येत आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मरीन लाईन्स स्थानकादरम्यान विद्युत वाहिनीवर झाड कोसळल्याने शॉर्ट सर्किट झाल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी अनेक भागात पाणी साचलं आहे. त्याचे परिणाम वाहतुकीवर दिसून येतात. मुंबई पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट आणि मरीन लाईन लोकल स्थानकांदरम्यान अचानक शॉर्ट सर्किटमुळे मोठा स्फोट झाला. विद्युत वाहिनीवर झाड आल्याने त्याला देखील आग लागल्याची घटनाही घडली आहे.
मुंबईत सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडला. मुंबई महापालिकेच्या काही ऑटोमॅटिक वेदर स्टेशनवर एका तासात 80 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर आयएमडीने म्हटले आहे की सकाळी ९ ते १० वाजेदरम्यान झालेला पाऊस हा अचानक झाला. आयएमडीनुसार, दक्षिण मुंबईत अत्यंत मुसळधार पाऊस पडेल. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार रमंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कुलाबा अग्निशमन केंद्रात ७७ मिमी, ग्रँट रोड आय हॉस्पिटलमध्ये ६७ मिमी, मेमनवाडा अग्निशमन केंद्रात ६५ मिमी, मलबार हिलमध्ये ६३ मिमी आणि डी वॉर्डमध्ये ६१ मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरांबद्दल बोलायचे झाले तर, तेथे तुलनेने कमी पाऊस पडला आहे. मानखुर्द अग्निशमन केंद्र आणि एपीएस स्कूल मानखुर्दमध्ये फक्त १६ मिमी, नूतन विद्यालय मंडळात १४ मिमी आणि कलेक्टर कॉलनीमध्ये १३ मिमी पावसाची नोंद झाली.
पश्चिम उपनगरात, वांद्रे सुपारी टाकी, गजदरबंद पंपिंग स्टेशन आणि खार दांडा येथे २९ मिमी पाऊस पडला, तर स्वच्छता विभाग कार्यशाळा, एचई वॉर्ड ऑफिस आणि विलेपार्ले अग्निशमन केंद्रात २२ मिमी पाऊस पडला.