
नवी मुंबईत १११ जागांसाठी तब्बल ७०० पेक्षा अधिक अर्ज (फोटो सौजन्य - iStock)
निवडणुकांचे वेध
कोरोनामुळे तब्बल १० वर्षांनी निवडणूक होणार आहेत. त्यामुळे पक्षात कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला या निवडणुकीचे वेध लागले असून, अनेकजणांना नगरसेवकपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. यंदाची निवडणूक ही प्रथमच प्रभाग पद्धतून होणार असल्याने, उमेदवारांना आर्थिक गणितांची देखील जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळे ७०० पेक्षा अधिक जण भाजपातून इच्छुक असले तरी कोणता उमेदवार किती खर्च करू शकेल या पडद्याआड असणाऱ्या महत्वाच्या पैलूचा देखील विचार पक्षाला करावा लागणार आहे.
पक्षाकडून अंतर्गत सर्वेला सुरुवात
आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा संघटनात्मक पातळीवर तयारीला वेग आला आहे. मंडळ निहाय, प्रभागनिहाय पदाधिकारी बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकींच्या माध्यमातून प्रभागस्तरावरील राजकीय व संघटनात्मक तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. उमेदवार निश्चितीसाठी पक्षाकडून अंतर्गत सर्वे खासगी एजन्सी नेमून पूर्ण केले जात आहेत. त्यातून उमेदवारांच्या ताकदीचा, सक्षमतेचा तसेच नागरिकांमध्ये उमेदवाराची असलेली लोकप्रियता याबाबतचे निकष तपासले जाणार आहेत. यात संघाची भूमिका देखील तितकीच महत्वाची राहणार आहे.
७०० हून अधिक अर्ज
तब्बल १११ जागांसाठी तब्बल ७०० हून अधिक इच्छुकांनी अर्ज भरून दिले आहेत. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड असतानाच विरोधी पक्षातील इच्छुकांसाठी देखील पक्षाची दारे उघडी ठेवावी लागणार आहेत. त्यामुळे निष्ठावंत बाजूला आणि बाहेरचे उमेदवार आत अशी स्थिती निर्माण होऊन ऐनवेळी नाराजी देखील उफाळून येण्याची शक्यता आहे.
एका घरात किती तिकिटे ?
भाजपात सर्वात महत्वाचा फॅक्टर एका घरात एक तिकिट हा आहे. लोकसभा, विधानसभेला कटाक्षाने पक्षाकडून हे सूत्र पाळले जाते.मात्र नुकत्याच झालेल्या नगर परिषदा निवडणुकांमध्ये अनेक आमदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे पालिका निवडणुकांमध्ये देखील अनेक ठिकाणी पक्षाकडून आमदारांच्या नातेवाईकांना तिकिटे दिली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपात एका कुटुंबातून अनेकजण इच्छुक आहेत.अनेकजण माजी नगरसेवक राहिलेले आहेत. त्यांना त्या संपूर्ण उमेदवारांसह, जादा तिकिटांची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे नवी मुंबईतील जुन्या नव्यांचा वाद कायम असून, यंदा निष्ठावंतांना देखील पक्षाला मानाचे स्थान द्यावे लागणार आहे.अन्यथा नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला ही आव्हान पेलावे लागणार आहे.
नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी ७०० पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. अद्याप इच्छुक अर्ज घेऊन जात आहेत. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मंत्री गणेश नाईक प्रभारी तर संजीव नाईक निवडणूक प्रमुख आहेत. आ. मंदा म्हात्रे तसेच मी स्वतः असे आम्ही मिळून उमेदवार निवडीची प्रक्रिया राबविणार आहोत. अधिवेशन झाल्यावर बैठक लावण्यात येईल. इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातील.निवडून येण्याची क्षमता, नागरिकामध्ये असलेली पकड, अंतर्गत सर्वे करून मग उमेदवारांची यादी प्रदेशकडे पाठवून, प्रदेश पातळीवरून निश्चिती होणार आहे – डॉ. राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष, भाजपा, नवी मुंबई