वाशीतील रहेजा कॉम्प्लेक्स आग प्रकरण, दोन जणांवर गुन्हा दाखल
संपूर्ण देशात दिवाळीनिमित्त फटाक्यांच्या आतिषबाजीचा आवाज घुमत होता. तर दिनांक 21 सप्टेंबर रोजी च्या रात्री वाशीतील महात्मा गांधी कॉम्प्लेक्स मध्ये फक्त अग्निशमन दलाच्या गाड्यांचा व ॲम्बुलन्सच्या सायरनने कानठळ्या बसवल्या होत्या. या महात्मा गांधी कॉम्प्लेक्स मधील रहेजा रेसिडेन्सी या इमारतीच्या बी विंग मधील दहाव्या मजल्यावर पहिल्यांदा आग लागली होती. कालांतराने आगीने रौद्ररूप धारण करत वरील अकराव्या व बाराव्या मजल्यावरील घरात देखील प्रवेश केला, व तेथील घराला आपल्या भक्षस्थानी घेतले. अचानक झालेले आगीच्या घटनेत वेदिका अय्यर या 6 वर्षीय चिमुरडीसह सुंदर बाल कृष्णन, पूजा राजन व कमला हिरालाल जैन, या चौघांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी वाशी पोलिसांनी प्रदीप भीमराव पाटील, वय 41 वर्ष, राहणार कोपरखैरणे, व संजय विठ्ठल उबाळे, वय 50 वर्ष, राहणार सेक्टर 9 वाशी, या दोघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रदीप भीमराव पाटील हे रहेजा रेसिडेन्सी या इमारतीच्या अग्निशमन सुरेक्षेची व्यवस्था पाहण्याचं काम करतात. तर संजय विठ्ठल उबाळे हे सोसायटीचे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. सोसायटीच्या या दोनही जबाबदार व्यक्तींनी बेजबाबदारपणे वागणूक करत, कामात निष्काळजीपणा केल्याने इमारतीतील चार निष्पक जीवांचा बळी गेला. असं पोलीस तपासात निष्पन्न झाल्यावर, वाशी पोलिसांनी दोन्ही आरोपींवर बीएनएस कलम 106 (1) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबईतील आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. आग इतकी भीषण होती की पहाटे ४ वाजता ती आटोक्यात आणण्यासाठी अनेक तासांचे अथक प्रयत्न करावे लागले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.






