mp sharad pawar reaction on Pahalgam Terrorist Attack jammu kashmir
सिंधुदुर्ग: जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करुन अशांतता निर्माण करण्यात आली. यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण देशातून रोष व्यक्त केला जात आहे. पहलगाममधील या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांनी आपला जीव गमावला आहे. यावर आता जेष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या प्रत्येक कृतीला आमचा पाठिंबा असल्याचे देखील शरद पवार यांनी नमूद केले आहे.
शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावरुन प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “काश्मीरमध्ये जे झालं, त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व देशवासियांनी एका विचाराने सरकार बरोबर राहिलं पाहिजे. त्यात राजकारण आणायचं नाही. अतिरेक्यांनी भारताविरोधात कारवाई केली, देशविरोधात जेव्हा कारवाई होते, तेव्हा तिथे राजकीय मतभेद ठेवायचे नसतात. काल सर्व पक्षीय बैठक होती. आमच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित होत्या, सर्व राजकीय पक्षांनी या प्रश्नावर केंद्र सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली याचा आनंद आहे. माझी विनंती आहे की, जे काही निर्णय घेतले जातील त्यात आम्ही सरकार सोबत आहोत,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राजकारणी एकत्र राहिले तसेच काश्मीरमधील लोक देखील दहशतवाद्यांविरोधात एकत्र आल्याने शरद पवार यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, “पहलगाममध्ये हल्ला झाला, तेव्हा काश्मीरचे लोकं रस्त्यावर उभे राहिले. भारताच्या बाजूने उभे राहिले. ही जमेची बाजू आहे. जे लोक भारताच्या बाजूने उभे राहिले त्यांचा चरितार्थ हा कदाचित संकटात जाईल अशी स्थिती आहे. याचीच मला काळजी याची आहे. काश्मीरचं अर्थकारण संकटात येईल. लोक पर्यटनाला जाणार नाहीत. याचा परिणाम काश्मीरच्या लोकांवर होईल. याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावे,” अशी विनंती शरद पवार यांनी केली आहे.
पहलगाम दहशतवादी हलल्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
केंद्र सरकारकडून सुरक्षेमध्ये कमतरता राहिली असल्याची कबुली दिली आहे. याबाबत शरद पवार म्हणाले की, “गेले काही दिवस सरकारच्या वतीने सतत सांगितले जात होते की, आम्ही मोडून काढले. दहशतवाद आम्ही संपवला. आता काय चिंता नाही. असं होत असेल तर आनंद आहे. घडलेली घटना बघितल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे हे स्पष्ट आहे. ही कमतरता सरकारने घालवायला हवी. सरकार कमतरता आहे हे मान्य करत असेल त्यांनी तातडीने पावले टाकावीत. काही कामात आम्हा लोकांचं सहकार्य राहील. पहलगाम हे त्यातल्या त्यात अधिक सुरक्षित आहे. सातत्याने आपले लोक तिथे जातात, मी सुद्धा दोन महिन्यांपूर्वी जाऊन आलो. दहशतवाद्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केले,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.