
1 सप्टेंबरपासून एसटी प्रवासासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य; पात्र लाभार्थ्यांना नोंदणीचे आवाहन
एनसी एमसी स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एसटी प्रवासातील तिकीट व्यवहार अधिक सुलभ आणि कॅशलेस करण्याच्या दिशेने महामंडळाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना एनसी एमसी स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात येत आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसी एमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर एनसी एमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
यावेळी परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, “एसटी ही केवळ प्रवासाची सेवा नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाशी जोडलेली लोकवाहिनी आहे. या ‘लालपरी’चा प्रवास काळानुरूप अधिक आधुनिक, डिजिटल आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. NCMC स्मार्ट कार्डला मिळणारा प्रतिसाद हा प्रवाशांचा या डिजिटल परिवर्तनावरील विश्वास दर्शवितो. भविष्यात एसटीच्या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रवाशांचा वेळ वाचविणे आणि त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
येत्या 15 ऑगस्टपासून राज्यभरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी एनसी एमसी स्मार्ट कार्डच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एनसी एमसी कार्डसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. प्रवाशांना एनसी एमसी स्मार्ट कार्ड अधिकृत एसटी आगार, बसस्थानक तसेच अधिकृत एजंट नेटवर्कच्या माध्यमातून मिळविता येणार असून, त्याच माध्यमातून कार्ड रिचार्जची सुविधाही उपलब्ध आहे.
ST Bus: एसटीच्या पदोन्नती प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासी खेळ