लालपरीच्या अडचणीत वाढ! परिवहन विभागाची श्वेतपत्रिका जाहीर, किती कोटींचा तोटा? जाणून घ्या सविस्तर बातमी (फोटो सौजन्य-X)
MSRTC White Paper in Marathi: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बिघडत्या आर्थिक स्थिती लक्षात घेत राज्य सरकार आता त्यात पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सोमवारी (२३ जून) एक सविस्तर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करणार आहेत, ज्यामध्ये महामंडळाची सध्याची आर्थिक स्थिती, तोटा, महसूल, खर्च, थकीत कर्जे आणि प्रलंबित देयके यांची संपूर्ण माहिती देण्यात आली. या श्वेतपत्रिकातून केवळ परिस्थिती सार्वजनिक होणार नाही तर महामंडळाला संकटातून बाहेर काढण्यासाठी संभाव्य उपाय देखील सुचवले जाणार आहेत.
एसटी महामंडळाला सध्या दररोज १ ते २ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. आतापर्यंत तर एकूण तोटा १०,००० कोटींपेक्षा जास्त झाला आहे. मार्च २०२४ मध्ये भाड्यात सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी, परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. गेल्या ९ वर्षांत एसटी महामंडळाने ऑगस्ट २०२३ वगळता कोणत्याही महिन्यात नफा कमावलेला नाही. त्या एका महिन्यात ₹ १६.०८ कोटींचा नफा नोंदवला गेला. महामंडळावर सध्या कर्मचाऱ्यांचे ₹३,५०० कोटी आणि पायाभूत सुविधा आणि पुरवठा देणी म्हणून ₹७,००० कोटी देणे आहे.
सरकारने आता परिवहन मंत्र्यांच्या पूर्वपरवानगीनंतरच ₹१ कोटींपेक्षा जास्त खर्चाला परवानगी देऊन आर्थिक शिस्त लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना पगार देयके देण्यास होणारा विलंब थांबवण्यासाठी आणि खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि अपंग व्यक्तींसह एकूण ३१ श्रेणींना एमएसआरटीसी सवलतीच्या दरात प्रवास सुविधा पुरवते. त्या बदल्यात सरकार मासिक ₹३५०-४०० कोटींची मदत देते, परंतु यामध्येही ₹१,००० कोटींपेक्षा जास्त रक्कम अद्याप प्रलंबित आहे.
श्वेतपत्रिकेत प्रस्तावित केलेल्या उपाययोजनांमध्ये तोट्यातील लांब पल्ल्याच्या मार्गांवर कपात करणे, जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न वाढवणे, महामंडळाच्या रिकाम्या जमिनींचा व्यावसायिक वापर आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन महसूल वाढवणे यांचा समावेश आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अध्यक्ष म्हणून आर्थिक निर्णयांवर थेट देखरेख सुरू केली आहे. त्यांनी असेही आदेश दिले आहेत की आता त्यांच्या परवानगीशिवाय कोणताही मोठा खर्च, कराराची मंजुरी, विस्तार किंवा खरेदी केली जाणार नाही.
दरम्यान, गेल्या आठवड्यात मंत्री सरनाईक यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रविवारी (२२ जून) रात्री त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी काही दिवस विश्रांती घेईन आणि नंतर नवीन उर्जेने सेवा करण्यास तयार राहीन. तुमचे आशीर्वाद असेच राहोत.”, आता सर्वांचे लक्ष श्वेतपत्रिकेवर आहे जे एमएसआरटीसीला या संकटातून कसे बाहेर काढायचे आणि सरकारने उचललेली पावले यामध्ये प्रभावी ठरतील का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.