केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरीचं अडकेल वाहतूक कोंडीत; चक्क दौरा करावा लागला रद्द
देशभरात रस्त्यांचं जाळ निर्माण करणारे मंत्री म्हणून नितीन गडकरी यांची ओळख आहे. मात्र आज पुण्यात ते स्वत: वाहतूक कोंडीत अडकले होते. इतकंच नाही तर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे त्यांना त्यांचा पाहणी दौरा रद्द करावा लागला आहे. चक्क वाहतूकमंत्र्यांनाच असा ट्रॅफीकचा सामना करावा लागल्याने याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील शनिवार वाडा ते स्वारगेट पर्यंत भुयारी मार्गाचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित भुयारी मार्गासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा पाहणी दौरा आज आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार नितीन गडकरी शनिवार वाडा येथे पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. पण या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांब रांगा लागल्या. यात नितीन गडकरींची कारही अडकून पडली.
गडकरी यांची गाडी पुढे जात नव्हती. शेवटी पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. पण वाहतूक कोंडी फोडता आली नाही. नाईलाजास्तव नितीन गडकरी यांना पाहणी दौरा रद्द करावा लागला. गडकरींनी कामधूनच अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला.
पुण्यातील वाहतूककोंडीची समस्या दररोजचा विषय बनली आहे. पुणेकरांना याचा दररोज सामना करावा लागतो. त्याचा फटका आज खुद्द नितीन गडकरींना बसला आहे. दरम्यान या वाहतूक कोंडीला पोलीस आणि स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचं स्थानिक आमदार रासने यांनी म्हटलं आहे. पोलीस आणि पालिका प्रशासन यांच्यात योग्य समन्वय नसल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याबाबतचे निवेदन देऊन लवकरच यासंदर्भात बैठक घेऊ, असं आश्वासन नितीन गडकरी यांनी दिलं आहे.