
Jalgaon News: उपवर्गीकरणाविरोधात मुक्ताईनगरात ‘एल्गार’! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Muktainagar Reservation Protest 2026: जळगावच्या मुक्ताईनगर येथे ४अनुसूचित जातींच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील सकल बौद्ध समाजाच्या वतीने शुक्रवारी (४ सप्टेंबर) शहरात हजारोंच्या संख्येने विराट मोर्चा काढण्यात आला. महिला, पुरुष, युवक-युवती तसेच अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने शहरातील वातावरण निळे झाले होते.
‘आरक्षण उपवर्गीकरण रद्द करा’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कृउबा समिती, बोदवड रोड येथून दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. बोदवड चौफुली, बसस्थानकमार्गे मोर्चा परिवर्तन चौकात पोहोचला. सहभागी समाजबांधवांनी पांढरे वस्त्र परिधान करून गळ्यात निळे रुमाल आणि हातात निळे ध्वज घेतले होते. त्यामुळे संपूर्ण मोर्चा निळ्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसत होते. परिवर्तन चौकात महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. Jalgaon News:
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख पोलीस बंदोबस्ता तैनात करण्यात आला होता. मोर्चादरम्यान कुठेही कायदा वा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन केल्यामुळे मोर्चाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली नाही. त्यामुळे मोचा शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
मौर्चानंतर परिवर्तन चौकात झालेल्या सभेत मालेगाव येथून आलेले प्रमुख वक्ते सुनील पवार यांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेमुळे अनुसूचित जातींमधील विविध घटकांच्या संविधानिक आरक्षणाच्या हक्कांवर संभाव्य परिणाम, सामाजिक व शैक्षणिक परिणाम तसेच या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज याबाबत त्यांनी उपस्थितांना संबोधित कैले.
पवार यांच्या मार्गदर्शनानंतर युवक-युवतीनी पथनाट्याच्या माध्यमातून आरक्षणाचा प्रश्न आणि सामाजिक वास्तव प्रभावीपणे मांडले, पथनाट्याला उपस्थित समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.