मुंबई : लोकसभा निवडणूक देशभरामध्ये सुरु आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान देखील पार पडले आहे. राज्यामध्ये हे शेवटचे मतदान असून यामध्ये 13 मतदारसंघातील मतदान पार पडले. नाशिकसह मुंबईमधील मतदान पार पडले. मात्र मुंबईमधील अनेक मतदानकेंद्रावर सावळा गोंधळ सुरु असल्याचे निदर्शनास आले. अनेक मतदारांची नावे याद्यांमध्ये दिसली नसून मतदान देखील अतिशय संथ गतीने चालू होते. त्यामुळे अनेक केंद्रांच्या बाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. यावरुन ठाकरे गट देखील आक्रमक झाला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली असून या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी होणार आहे.
मुंबईतील मतदानावेळी अनेक केंद्रावर गोंधळ झाल्याचे दिसून आले. तसेच उन्हामध्ये लांबच्या लांब रांगा लावल्यामुळे नागरिक देखील संतप्त झाले होते. मतदानाच्या दिवशी प्रशासनाकडून ढिसाळ कामकाज झाल्याचे समोर आले आहे. मतदानाला विलंब होत होता, काही लोकांना जास्त वेळ रांगामध्ये थांबल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व बाबींची आता होणार चौकशी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिव नितीन करी यांना तसे आदेश दिले आहेत. तसेच, मुख्य सचिवांनी तातडीनं याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी, असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
सुषमा अंधारे यांचे ट्वीट
मतदानासाठी अशा लांब रांगा कधीही बघितल्या नसतील. पराभव आपल्या टप्प्यात आहे असे दिसताक्षणी ज्या पद्धतीने भाजपाने स्वायत्त यंत्रणा हाताशी धरून रडीचा डाव खेळला आहे त्याचे हे बोलके चित्र..
मतदान केंद्रावर उशीर होत होता की मुद्दाम प्रक्रिया रेंगाळत ठेवली गेली जेणेकरून मतदान होऊच नये pic.twitter.com/TaVFmc9fPl— SushmaTai Andhare? (@andharesushama) May 20, 2024
मुंबईमध्ये अनेक लोक लांबून लांबून मतदान करण्यासाठी आले होते. मात्र प्रत्यक्षात केंद्रावर आल्यानंतर त्यांचे यादीमधून नाव वगळण्यात आल्याचे दिसून आले. तसेच एका तासामध्ये केवळ 11 लोकांनीच मतदान केल्याचा प्रकार देखील समोर आला आहे. मतदार याद्यांचा घोळ आणि गोंधळाच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमूण तपास केला जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे संजय राऊत व सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ शेअर करत महायुतीवर गंभीर आरोप केले होते. पराभव समोर दिसत असल्यानेच असे प्रकार घडल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. या प्रकरणाची मुख्यमंत्री शिंदेंनी दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.