
२,७५४ मेट्रिक टन विसर्जनोत्तर साहित्याचे संकलन! मुलुंड येथील तात्पुरत्या केंद्रात साठवणूक
Mumbai News: गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन झालेल्या गणेशमूर्ती आणि त्यासोबतच्या विसर्जनोत्तर साहित्याचे संकलन करून त्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई महापालिकेने यंदा व्यापक मोहीम राबवली. गणेशोत्सवादरम्यान १६ ते २७ सप्टेंबर २०२६ या १२ दिवसांच्या कालावधीत मुंबईतून तब्बल २,७५४.८५ मेट्रिक टन विसर्जनोत्तर साहित्याचे संकलन करण्यात आले असून, ते निर्धारित मुलुंड येथील तात्पुरत्या साठवणूक केंद्रात पोहोचविण्यात आले आहे. या प्रचंड साहित्याची वाहतूक करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून एकूण ७०७वाहन फेऱ्या करण्यात आल्या.(फोटो सौजन्य – AI)
मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आदेश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या मार्गदर्शक शिफारशींचे काटेकोर पालन करण्यासाठी ही पावले उचलण्यात आली. पारंपरिक शाडू मातीप्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पाण्यात नैसर्गिकरीत्या विरघळत नाही.
Mumbai: ठाणे-मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठ्या मागण्या; ४८ प्रवासी संघटनांची रविंद्र चव्हाणांसोबत बैठक
पाण्यात विसर्जनानंतर पीओपीच्या मूर्ती ओल्या आणि ठिसूळ होतात. त्यामुळे संकलन, वाहनांमध्ये भरणे आणि उतरवणे या प्रक्रियेदरम्यान मूर्तीचे भाग नैसर्गिकरीत्या वेगळे होतात. हा प्रचंड साठा निर्धारित वेळेत कृत्रिम तलावांमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पथकांना यांत्रिक साधनांचा वापर करावा लागला. वाहतुकीसाठी स्वच्छ आणि पूर्णतः आच्छादित वाहने वापरण्यात आली असून, प्रत्येक फेरीचे अधिकृत वजनकाट्यावर वजन नोंदवून छायाचित्रे व व्हिडिओद्वारे दैनंदिन प्रगती अहवाल जतन करण्यात आला असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
विसर्जन कालावधीतील आकडेवारीनुसार, २६ सप्टेंबर रोजी एकाच दिवसात सर्वाधिक वाहतूक नोंदवली गेली. या दिवशी पालिकेच्या १३१ वाहन फेऱ्यांच्या माध्यमातून तब्बल ५१०.९२ मेट्रिक टन विसर्जनोत्तर साहित्याची वाहतूक करण्यात आली. त्याखालोपाठ २० सप्टेंबर रोजी ११९ वाहनांमधून ४३६.३३ मेट्रिक टन, तर १९ सप्टेंबर रोजी १०८ वाहनांमधून ४०४.०८ मेट्रिक टन साहित्याची ने-आण करण्यात आली, विसर्जनाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी देखील ९९ फेऱ्यांद्वारे ३६६.०३ मेट्रिक टन साहित्याची विल्हेवाट लावण्यात आली होती.
मोठी बातमी ! दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा; परीक्षाशुल्क माफीचा शासन निर्णय जारी
विभागस्तरावरील आकडेवारीनुसार, अंधेरी पश्चिम, जुहू आणि वर्सोवा परिसराचा समावेश असलेल्या ‘के/पश्चिम’ विभागातून सर्वाधिक ३१४.८२ मेट्रिक टन साहित्याची वाहतूक करण्यात आली. यासाठी ११५ वाहने तैनात करण्यात आली होती. त्यापाठोपाठ भांडुप आणि कांजूरमार्ग परिसरातील ‘एस’ विभागातून १०१ वाहन फेऱ्यांद्वारे २५३.५८ मेट्रिक टन, तर ग्रँट रोड, मलबार हिलचा समावेश असलेल्या ‘डी’ विभागातून २१ फेऱ्यांद्वारे २४९.४३ मेट्रिक टन साहित्याचे संकलन करण्यात आले. याशिवाय दादर-माहिमच्या ‘जी/उत्तर’ विभागातून १९०.४२ मेट्रिक टन आणि मुलुंडच्या ‘टी’ विभागातून १५५.३६ मेट्रिक टन विसर्जनोत्तर साहित्य तात्पुरत्या केंद्राकडे पाठवण्यात आले आहे.