
वातानुकूलन यंत्रणेच्या देखभालीवर भर! पालिका रुग्णालये, शवागारांसाठी २.६६ कोटींचे कंत्राट; 'ब्लू स्टार'ची केली निवड
वातानुकूलन यंत्रणा सुरळीत आणि कार्यक्षम ठेवण्यावर दिला भर.
कंपनीला दिले एक वर्षासाठी काम
कामासाठी ‘ब्लू स्टार’ कंपनीची निवड
Mumbai News: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख व उपनगरीय रुग्णालये, प्रसूतीगृहे, शवगृहे आणि महत्त्वाच्या कार्यालयांमधील ‘ब्लू स्टार’ बनावटीच्या वातानुकूलित आणि प्रशीतन यंत्रांच्या सर्वसमावेशक देखभाल आणि दुरुस्तीसाठी पालिकेने २ कोटी ६६ लाख ६२ हजार ७७६ रुपयांचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी ‘मेसर्स ब्लू स्टार लिमिटेड’ या मूळ उत्पादक कंपनीची निवड करण्यात आली असून, हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. पालिकेच्या रुग्णालयांमधील शस्त्रक्रियागार, अतिदक्षता विभाग, रक्तपेढी आणि शवगृह यांसारख्या अत्यंत संवेदनशील विभागांमध्ये २४ तास अखंडित वातानुकूलन यंत्रणा सुरू ठेवणे अनिवार्य असते.(फोटो सौजन्य – istock)
Shivsena News : विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द; सहा वर्षांची निवडणूक बंदी, ठाकरे गटाला मोठा धक्का
सध्या सुरू असलेले देखभालीचे कंत्राट ३० सप्टेंबर २०२६ रोजी संपुष्टात येत असल्याने, पुढील एका वर्षासाठी म्हणजेच १ ऑक्टोबर २०२६ ते ३० सप्टेंबर २०२७ नवीन कंत्राट देण्याची प्रक्रिया पालिका प्रशासनाने हाती घेतली होती.या कामासाठी महापालिकेने सुमारे २ कोटी ३५ लाख ३७ हजार ०५५ रुपये वस्तू व सेवा कर वगळून आणि करसहित २ कोटी ७७ लाख ७३ हजार ७२४ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून ई-निविदा मागवल्या होत्या. यामध्ये तीन कंपन्यांनी सहभाग घेतला होता.
त्यापैकी ‘मेसर्स ब्लू स्टार लिमिटेड’ यांनी अंदाजपत्रकापेक्षा ४ टक्के कमी, म्हणजेच १८ टक्के वस्तू व सेवा करासह एकूण २ कोटी ६६ लाख ६२ हजार ७७६ रुपयांची सर्वात कमी बोली लावली. त्यांच्या तुलनेत मेसर्स व्होल्टास लिमिटेड यांनी २.७० टक्के तर मेसर्स योगी इंटरप्रायजेस यांनी १.१० टक्के कमी दराची निविदा सादर केली होती.
सर्वांत कमी दर सादर केल्यामुळे आणि संबंधित यंत्रेही मूळ ‘ब्लू स्टार’ बनावटीचीच असल्याने पालिका प्रशासनाने या कंपनीला १२ महिन्यांचे कंत्राट देण्याची शिफारस केली आहे. या कंत्राटांतर्गत केईएम, नायर, शीव आणि कस्तुरबा यांसारखी प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह तसेच महापालिका मुख्यालयातील शीतकरण संयंत्र, वातानुकूलित संच, शीतकक्षा आणि शवगृह पेट्यांची नियमित देखभाल व दुरुस्ती केली जाणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळताच या कंत्राटावर स्वाक्षरी करण्यात येईल.