
रेल्वे स्थानकातच मिळणार किराणा, झेरॉक्स! नायगाव, विरार स्थानकातील मोकळ्या जागेत व्यावसायिक कियोस्क
Mumbai News: मुंबईतून कामावरून घरी परतताना किराणा सामानासाठी किंवा तातडीच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स व प्रिंटसाठी आता वसई-विरारकरांना बाजारात धावपळ करावी लागणार नाही. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने उपनगरीय स्थानकांतील मोकळ्या जागांचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय घेतला असून, यात नायगाव आणि विरार स्थानकात थेट किराणा स्टोअर आणि फोटोकॉपी कियोस्क उभारले जाणार आहेत. लोकल प्रवाशांचा दैनंदिन प्रवासातील वेळ वाचावा आणि रेल्वेला अतिरिक्त बिगर-भाडे महसूल मिळावा, या दुहेरी उद्देशाने हा पाच वर्षांचा करार करण्यात आला असून लवकरच या सुविधा प्रत्यक्ष प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या उपक्रमांतर्गत प्रवाशांना लोकलमधून उतरताच पॅकबंद किराणा माल, दुग्धजन्य उत्पादने आणि घरगुती वापराच्या वस्तू थेट स्थानकातच खरेदी करण्याची सोय मिळणार आहे.(फोटो सौजन्य – AI)
BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा
याशिवाय शासकीय, निमशासकीय वा वैयक्तिक कामांसाठी लागणारी कागदपत्रांची झेरॉक्स व प्रिंट काढण्यासाठी स्थानकाबाहेर शोध घेत फिरण्याची गरज उरणार नाही, कारण ही सुविधाही स्थानक परिसरातच उपलब्ध करून दिली जात आहे.प्रवाशांच्या नियमित ये-जा करण्याला अडथळा न होता सहज खरेदी करता यावी, अशा मोक्याच्या जागांची निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या धावपळीतून रात्री उशिरा वसई-विरारमध्ये परतणाऱ्या नोकरदारांना, विशेषतः महिला प्रवाशांना या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
नायगाव स्थानकात पूर्वेकडील भुयारी मार्ग व मुख्य प्रवेशद्वाराजवळ १२० चौरस फुटांची जागा दिली असून, तिचे वार्षिक परवाना शुल्क २.१६ लाख रुपये आहे. विरार स्थानकात पूर्वेकडील तिकीट आरक्षण कार्यालयालगत तब्बल ३८७ चौरस फुटांची मोठी जागा उपलब्ध करून दिली असून, तिचे वार्षिक भाडे ४.५६ लाख रुपये ठरले आहे. तसेच अंधेरी स्थानकात १६० चौरस फूट जागेसाठी वार्षिक १३.०९ लाख रुपये शुल्क आकारले असून, ५ स्थानकांचे एकूण कंत्राट मूल्य सुमारे १.२० कोटी रुपये आहे.
८८ रेल्वे स्थानकांतील मोकळ्या जागांचा व्यावसायिक वापर करून प्रवाशांना दर्जात्मक सेवा देणे आणि त्याचबरोबर रेल्वेचा अतिरिक्त महसूल वाढवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. हा उपक्रम प्रवासी सुविधा आणि रेल्वेचे उत्पन्न या दोन्ही आघाड्यांवर फायदेशीर ठरेल. या अभिनव मॉडेलमुळे नायगाव आणि विरार ही रेल्वे स्थानके प्रवासासोबतच नागरिकांसाठी बहुपयोगी सुविधा केंद्रे म्हणून नावारूपास येणार आहेत, अशी माहिती विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे यांनी दिली आहे.