
Mumbai News: झेब्रा क्रॉसिंगविना पादचाऱ्यांचे होताहेत हाल! वाहतूक पोलिसांनी कळवूनही महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
Mumbai News: मुंबईत अनेक ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग नसल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागते. यात सर्वाधिक हाल ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला आणि शालेय विद्याथ्यांचे होतात. ही समस्या अनेक ठिकाणी असली, तरी भांडुप येथील सोनापूर उड्डाणपुलाखाली आणि मानखुर्द शीव-पनवेल मार्गावर सर्वाधिक होत आहे. या दोन्ही ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनांची वर्दळ चोवीस तास असते.(फोटो सौजन्य – AI)
शहरातील अनेक चौकांत झेब्रा क्रॉसिंग एक तर नाही किंवा अत्यंत फिकट झालेले आहेत. ते ना वाहन चालकांच्या लक्षात येतात ना पादचारी व्यक्तींना दिसतात. शीव पनवेल महामार्ग देशातील सर्वात व्यस्त महामागाँमध्ये मोडतो. तरीही या ठिकाणी मानखुर्द महाराष्ट्र नगर बस थांबा जवळील उड्डाण पुलाखाली झेब्रा क्रॉसिंग नाही.घाटकोपर उड्डाणपुलावरून सुसाट गाड्या उतरून मुंबई किंवा नवी मुंबईच्या दिशेने निघून जातात. तर मुंबई कडून पनवेल वा घाटकोपर मार्गावर गाड्यांचा वेगही सुसाट असतो. शिवाय रस्ते बांधकामामुळे धीमी गतीतील वाहातूक या ठिकाणी मोकळा रस्ता असल्याने सुसाट होते. या ठिकाणी सिग्नल असले तरी, एकामागे एक सिग्नल सुटण्यापूर्वी गाड्या दामटल्या जात असल्याने रस्ता ओलांडण्यास संधी मिळत नाही.
असाच प्रकार भांडुप येथील सोनापूर बस थांब्याजवळ असणाऱ्या उड्डाणपुलाखाली आहे. येथे मेट्रो उड्डाणपुलाचेही काम सुरू आहे. त्यामुळे जड अवजड वाहनाची वर्दळ मोठ्या प्रमाणात होते. नवी मुंबई ठाणे, अंधेरी, मुलुंड, मरोळ, मजास या ठिकाणच्या गाड्यांचे मार्ग या चौकातून विभागले जातात. त्यामुळे प्रचंड वाहतूक होते. मात्र झेब्रा क्रॉस पट्टे नसल्याने येथेही नागरिकांची तारंबळ उडते.
येथे दररोज अनेक छोटे मोठे अपघात होत असतात. त्यात दोन्हीकडील वाहतूक पोलिस रात्रीच्या वेळी अनेकदा नसतात. अशा वेळी वाहने प्रचंड वेगाने मार्गक्रमण करत असल्याने रात्री-अपरात्री पादचारी लोकांना रस्ता ओलांडणे म्हणून जीवाची परीक्षा वाटते.अशी खंत भांडुप येथे राहणाऱ्या माधव नेने या ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केली.
या दोन्ही ठिकाणच्या वाहतूक पोलिसांशी चर्चा केली असता, त्यानी ही गंभीर समस्या असल्याचे मान्य केले. मात्र या प्रकरणी झेब्रा क्रॉस पट्टे मारावे अशी विनंती दोन्हीकडील मुंबई मनपा विभाग कार्यालयांना अनेकदा केली, पत्र, स्मरण पत्र देऊनही अद्याप तरी झेब्रा क्रॉस पट्टे अद्याप मारले नाहीत, अशी खंत पोलिसांनी व्यक्त केली. या बाबत संबंधित विभाग कार्यालयाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क न झाल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.