
राणीबागेतील पेंग्विन जाणार म्हैसूरला? श्री चामराजेंद्र प्राणिसंग्रहालयाच्या मंडळाकडून पेंग्विन कक्षाची पाहणी
Mumbai News: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय अर्थात राणीच्या बागेतील लोकप्रिय हम्बोल्ट पेंग्विन आता मैसूरच्या प्राणिसंग्रहालयातही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील श्री चामराजेंद्र प्राणिसंग्रहालयाच्या (म्हैसूर प्राणिसंग्रहालय) प्रतिनिधी मंडळाने नुकतीच राणीच्या बागेला भेट दिली. यावेळी प्रतिनिधी मंडळाने पेंग्विनच्या निवासस्थानाची, त्यांच्या देखभालीची तसेच व्यवस्थापनाच्या पद्धतीची पाहणी केली. म्हैसूर प्राणिसंग्रहालयात हम्बोल्ट पेंग्विन आणण्यासह मत्स्यालय उभारण्याच्या शक्यतांचाही विचार सुरू आहे.(फोटो सौजन्य – istock)
मुंबईतील राणीच्या बागेत २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून ८ हंबोल्ट पेंग्विन आणण्यात आले. त्यामधील एका पेंग्विनचा त्याच वेळी मृत्यू झाला. त्यानंतर सात पेंग्विन या कक्षात होते. येथील पेंग्विनच्या जोड्यांना पिल्ले झाल्याने आता पेंग्विनची संख्या गेल्या सहा वर्षांत २५ वर पोहोचली आहे. राणीच्या बागेत आलेल्या मैसूरच्या प्रतिनिधी मंडळात अभियंते, पशुवैद्यकीय अधिकारी आणि प्राणिपालकांचा समावेश होता.
पेंग्विनसाठी पोषक वातावरण कसे निर्माण केले जाते, त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घेतली जाते आणि त्यांच्या निवासस्थानाची देखभाल कशी केली जाते, याची माहिती त्यांनी घेतली. मुंबईतील राणीबाग हे देशातील हम्बोल्ट पेंग्विन असलेले एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. हा दौरा सुमारे महिनाभरापूर्वी झाल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र, म्हैसूर प्राणिसंग्रहालयाकडून अद्याप कोणताही औपचारिक प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.
मुंबई आणि म्हैसूर प्राणिसंग्रहालयांदरम्यान प्राण्यांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव अंतिम झाल्यास राणीच्या बागेच्या इतिहासात प्रथमच येथील पेंग्विन अन्य प्राणिसंग्रहालयात पाठविले जातील.त्याबदल्यात म्हैसूरमधून सध्या राणीच्या बागेत नसलेल्या प्रजाती मुंबईत आणण्याची शक्यता आहे. यामध्ये झेब्रा आणि जिराफ यांसारख्या प्राण्यांचा समावेश असू शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे.